November 1, 2025

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर

0
MSEDCL Go Green

      पुणे महावितरणच्या वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १ लाख ७२ हजार ४५० पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला आहे. यातील सर्वाधिक ३९.६ टक्के ग्राहक पश्चिम महाराष्ट्रातील आहेत.

या वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिल्याने त्यांची तब्बल २ कोटी ६ लाख ९४ हजार रुपयांची वार्षिक बचत होत आहे. या योजनेत आतापर्यंत राज्यातील ४ लाख ३५ हजार ९०२ वीजग्राहकांनी सहभाग घेतला आहे. यातील सर्वाधिक ३९.६ टक्के ग्राहक पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. तर पुणे परिमंडलातील १ लाख १५ हजार ४३५ ग्राहक राज्यात सर्वाधिक संख्येने या योजनेत सहभागी झाले आहेत.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइनद्वारे लगेचच बिल भरणा करणे आणखी सोपे झाले आहे. ‘गो-ग्रीन’ योजनेत सर्व लघुदाब ग्राहकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे जिल्ह्यात १ लाख २३ हजार ३९६ ग्राहक सहभागी झाले आहेत त्यांची १ कोटी ४८ लाख ७ हजार ५२० रुपयांची वार्षिक बचत होत आहे. तर या योजनेत सहभागी सातारा जिल्ह्यातील ११ हजार ५२५ ग्राहकांचे १३ लाख ८३ हजार रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार १९७ ग्राहकांचे १४ लाख ६३ हजार ६४० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १५ हजार ४५७ ग्राहकांचे १८ लाख ५४ हजार ८४० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील ९ हजार ८७५ ग्राहकांच्या ११ लाख ८५ हजार रुपयांची वीजबिलात वार्षिक बचत होत आहे.

‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page