व्यवसायातील संधींचा फायदा घेऊन प्रगती साधा : मिथिलेश पांडे
कोल्हापूर – एमएसएमईच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या व्यावसायिक संधींचा फायदा घेऊन व्यवसायाचा विस्तार करा, असे आवाहन जीजेईपीसीचे संचालक मिथिलेश पांडे यांनी केले.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व जीजेईपीसीच्या संयुक्त विद्यमाने येथील हॉटेल झोरबा येथे झालेल्या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमांची सुरवात झाली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सराफ संघाच्या पदाधिकारी व संचालकांच्या हस्ते झाला. नाहीद सुंके यांनीही मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या ३० जुलै ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मुंबई येथे आयआयजीएसतर्फे होणाऱ्या प्रदर्शनाला भेट द्यावी. कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, दिवसेंदिवस व्यवसायातील परिस्थिती बदलत चालली आहे. व्यवसायाचे स्वरूपही बदलत आहे. अशावेळी अशा कार्यशाळांच्या माध्यमातून नवतंत्रज्ञानाने सभासदांना अवगत करण्याचा हा प्रयत्न आहेत त्याचबरोबर देशभर होणाऱ्या प्रदर्शनांना भेट दिल्यास बाजारात आज नवीन काय आहे, याचीही माहिती त्यांना मिळेल. हॉलमार्क दागिन्याच्या बाबतीत आज ग्राहक अधिक सजग झाला आहे. त्यासाठी लवकरच संघाच्या वतीने हॉलमार्कसंबंधी कार्यशाळा आयोजित केली जाईल. त्यामध्ये व्यावसायिकांबरोबर शासनाच्या प्रतिनिधींचा सहभाग असेल. त्यामुळे हॉलमार्क ही संकल्पना अधिक स्पष्ट होईल.
मुंबईतील प्रदर्शनासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात सराफ व्यावसायिकांनी नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सचिव प्रीतम ओसवाल यांनी स्वागत केले. सचिव शिवाजी पाटील यांनी आभार मानले. यावेळी संचालक अशोककुमार ओसवाल, विजयकुमार भोसले, संजय रांगोळे, कुमार ओसवाल, कोल्हापूर जिल्हा सराफ उपाध्यक्ष दिनकर ससे, संचालक गजानन बिल्ले, संजय खद्रे, सतीश भोजे, दैवज्ञचे अध्यक्ष विजय घारे, मधुकर पेडणेकर, नंदू बेलवलकर, विकास जाधव यांच्यासह सराफ व सुवर्णकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
