कोल्हापूरच्या उद्योगाला चालना देण्यासाठी ‘मित्रा’ च्या माध्यमातून प्रयत्नशील : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोल्हापूरच्या उद्योगाला चालना देण्यासाठी व जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी “महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन” ( मित्रा ) च्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या शाश्वत विकास परिषदेतील निर्णयाची ठोस अंमलबजावणी करणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्राचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर ( स्मॅक ) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्मॅकचे अध्यक्ष सुरेंन्द्र जैन होते. टिचिंग लर्निंग कम्युनिटी (टीएलसी)चे अध्यक्ष जयकुमार पारीख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ना. क्षीरसागर म्हणाले, देशाची प्रगती होत असताना राज्याची प्रगती होणेही गरजेची आहे. विकासात्मक प्रगती करत असताना होणारे नुकसान टाळणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रात महापूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने माध्यमातून पूर नियंत्रणासाठी तब्ब्ल ३२०० कोटी मंजूर केले आहेत. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील फौंड्री हबची मागणी लवकरच पुर्ण होईल. २५६ कोटीचे कन्वेंशनल सेंटर मंजूर झाले आहे. उद्योग वाढले तर रोजगार वाढणार आहे. त्यामुळे उद्योगाला आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
यावेळी जयकुमार पारिख, स्मॅकचे संचालक शेखर कुसाळे, संजय भगत, नामदेव पाटील, आय. एफ. पाटील, भीमराव खाडे यांचेसह उद्योजक उपस्थित होते.
