आयटीआयमध्ये मुलींचा सहभाग वाढवावा – दीक्षांत समारंभात सुरेन्द्र जैन यांचे मार्गदर्शन
शिरोली : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुलींचा सहभाग वाढवावा तसेच व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुढे यावे असे आवाहन स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी स्मॅक संचलित श्रीमती सोनाबाई शं. जाधव मूलभूत प्रशिक्षण केंद्र व स्व. जवानमलजी गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन २०२४ आयटीआय अंतिम परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व्यवसाय पूर्ततेची शासकीय प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा व संस्थेतील व्यवसायनिहाय गुण यश प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा पुरस्कार वितरणाच्या दीक्षांत समारंभाच्या सोहळ्या प्रसंगी काढले. आयटीआय संस्थेच्या शैक्षणिक कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य कायम केले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास स्मॅकचे माजी अध्यक्ष आर. बी. थोरात , निमंत्रित सदस्य प्रकाश चरणे , ज्येष्ठ उद्योजक तुकाराम पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती , या मान्यवरांच्या हस्ते इलेक्ट्रिशियन , फिटर , मेकॅनिकल ड्राफ्ट्समन व वेल्डर या ट्रेड मधील प्रथम , द्वितिय , तृतीय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना गौरव सन्मानचिन्हे व शासनाकडून प्राप्त प्रमाणपत्रे ही देण्यात आली.
या प्रसंगी स्मॅक आयटीआयचे चेअरमन प्रशांत शेळके , स्मॅक संचालक राजू पाटील , शेखर कुसाळे , निमंत्रित सदस्य प्रकाश खोत, संजय भगत , विनय लाटकर, स्मॅक कमिटी सदस्य एम. वाय. पाटील तसेच बहुतेक पालक उपस्थित होते.
आयटीआयचे प्राचार्य प्रसन्न वरखेडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्था १९९४ पासून सुरु असून आज संस्थेस तीस वर्षे पूर्ण झाली आहे व आज पर्यंत संस्थेतून १,८०० प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण होऊन त्यातील शंभर विद्यार्थ्यांनी तर स्वतःचा व्यवसाय सुरू करून ते उद्योजक बनले आहेत व अन्य विविध नामवंत कंपनीमध्ये कार्यरत आहेत. आयटीआय मध्ये सर्व व्यवसायांमध्ये अत्याधुनिक मशीन्स व तंत्रज्ञान उपलब्ध असून नुकतेच कमिन्स कंपनीद्वारे प्रशिक्षणार्थ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापराचे सीएमएम हे मशीन सुद्धा संस्थेस मिळाले आहे. पुणे विभागातील सर्वोत्तम आयटीआय पुरस्कार प्राप्त झालेली ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे.
आर. बी. थोरात म्हणाले की, संस्थेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसहित एकत्र असा उद्योजक मेळावा आयोजित करावा व संस्थेतील अनुभवांचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करून घ्यावा. त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वाद दिले.
प्रकाश चरणे , तुकाराम पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
तर बीटीपी चे वरिष्ठ निर्देशक आण्णासो हसुरे यांनी सर्वांचे आभार मानले.
