कोल्हापूरची प्रतिमा ‘छोटे शहर’; मोठे उद्योग येणार कसे? उद्योजकांचा सवाल
                कोल्हापूर : ‘छोटे शहर’ अशी प्रतिमा असलेल्या कोल्हापुरात मोठे उद्योग कसे येथील? असा प्रश्न येथील ज्येष्ठ उद्योजक करीत असतानाच कोल्हापूरात काय आहे म्हणून आम्ही येथे उद्योग करावा? असा प्रश्न उद्योजकांची नवीन पिढी करीत आहे. अर्थात याचा सर्व दोष त्यांनी सरकारचे धोरण, स्थानिक राजकीय नेत्यांची उदासीनता, श्रेयवाद याला दिला आहे. कोल्हापुरात नुकतीच एक ‘उद्योजक मीट’ म्हणून परिषद पार पडली. यामध्ये विषय होता ‘उद्योग जगताची सद्यस्थिती आणि पुढील धोरण’. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच उद्योजक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमासाठी आ. सतेज पाटील आ. जयश्री जाधव आणि माजी आमदार मालोजीराजे हे राजकीय नेतेही उपस्थित होते.
यावेळी बहुतेक सर्वच उद्योजकांनी कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती उद्योगवाढी शिवाय अशक्य असल्याच्या भावना तळमळीने व्यक्त केल्या. उपस्थितानी याबाबत  मुद्दे मांडताना सांगितले की दुहेरी कराचा बोजा, छोट्या उद्योगाकडे दुर्लक्ष. असमतोल वीजदर आणि दर वाढ, तर स्थानिक पातळीवर कोल्हापुरातील जागेचा प्रश्न, हद्दवाढ, इफ्रास्ट्रक्चर,सोयी सुविधा, मोठे उद्योग, रेल्वे, विमानतळ, महामार्ग, कनेक्टिव्हिटी, इंडस्ट्रियल कॉरिडोर, आय टी या प्रलंबित प्रश्नाला राजकीय नेते  कारणीभूत असल्याचे मत स्पष्टपणे मांडले. गेल्या दहा वर्षात ही स्थिती आणखी बिघडली असल्याचे सांगताना केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारकडे अनेकानी बोट केले.
कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी 1906 साली म्हणजे शंभरहून अधिक वर्षांपूर्वी शाहू मीलच्या रूपाने कोल्हापुरात उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर मिरजेहून कोल्हापुरात रेल्वे आणली. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी या बाजारपेठा बसवल्या. मार्केट यार्ड येथे गुळ खरेदी विक्री सुरू करून परप्रांतातील व्यापाऱ्यानां व्यवसायासाठी निमंत्रित केले. राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणाची शेती बरोबरच उद्योगासाठी उपयुक्तता महत्त्वाची ठरली. छत्रपती राजाराम महाराजांनी येथे 1939 साली. उजळाईवाडी येथे विमानतळ सुरू केले. त्याकाळी उद्योग व्यवसायासाठी जे जे आवश्यक होते ते करून ठेवले. पण ज्या पद्धतीने आणि वेगाने त्याचे आधुनिकीकरण आणि प्रगती व्हायला हवी होती ती झाली नाही.
कोल्हापुरातील अनेक ज्येष्ठ उद्योजकांनी त्याकाळी उपलब्ध सोयी सुविधा वापरून उद्योग सुरू केले. बुद्धी कौशल्य, परिश्रम, सातत्य याचा वापर करून उद्योग वाढवले आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द केले. अनेकांची तिसरी, चौथी पिढी उद्योगात आहे. पण कोल्हापूरच्या स्थितीबाबत या पिढीचा अपेक्षाभंग झाला आहे. देश विदेशातील मोठी शहरे तेथील इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, आणि रेल्वे, विमान सेवा, हॉटेल्स, मॉल्स, रेसिडेन्सीयल एरिया, ऐतिहासिक स्थळाबरोबरच जाणीवपूर्वक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी निर्माण केलेली रिसॉर्ट, आणि इतर प्रेक्षणीय स्थळे, परिसर यातील काहीही येथे दिसत नाही. जे आहे ते सहज उपलब्ध होत नाही. मोठे उद्योग आणण्यासाठी हवे ते येथे काहीच मिळत नाही. त्यांनां जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कोल्हापूर हे छोटे शहर अशी प्रतिमा तयार झाली आहे. हद्दवाढ, पाणी प्रदूषण, महापूर आणि अंतर्गत रस्ते याबाबत भविष्यात काही सुधारणा होईल अशी ही स्थिती दिसत नाही. मग कोल्हापुरात छोटे उद्योग हे उद्योग येतीलच कसे? असा उद्योजकांचा प्रश्न आहे. उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेली तिसरी पिढी आणि येणारीही पिढी कोल्हापुरात उद्योग करावा असे आहेच काय असा प्रश्न करत आहे?  इतकेच नाही तर अनेक उद्योजकांच्या मुलांचा आग्रह आपल्या उद्योगाची हेड ऑफिस पुणे, मुंबईला हलवावी आणि प्रोडक्शन फक्त येथे ठेवावे असा आहे. अनेक कंपन्या कोल्हापूरात येण्याचा विचार करून सर्व्हेक्षण करतात तेंव्हा त्यांना उद्योगाच्या दृष्टीने बरेच काही नसल्याचे लक्षात येते आणि ते विचार सोडून देतात. तर आलेल्या कंपन्या पुढे विस्तार करू शकलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
संपूर्ण जग आयटी क्षेत्रावर चालत असताना कोल्हापुरातील आयटी बाबतची उदासीनतेची गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. या क्षेत्रात काम करणारे अवघी युवा पिढी पुणे, बेंगलोरसह परदेशात धाव घेत आहे. आयटी कंपन्या येत नाहीत. मोठे उद्योग येत नाहीत. त्यामुळे त्याला पूरक व्यवसाय सुरू होत नाही. कोणी करायचा प्रयत्न केला तर ते चालत नाही. म्हणूनच मोठे उद्योग यावेत येथील उद्योगांचा विस्तार व्हावा. आय टी  कंपन्या याव्यात यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.भविष्याचा वेध घेऊन प्रगतीकडे वाटचाल करायची असेल तर पक्षीय आणि अभिनिवेश किंवा श्रेयवाद जाणीवपूर्वक टाळला पाहिजे.
