कोल्हापूरात मुहूर्ताच्या सौद्यात हापूस, पायरी आंब्याला विक्रमी दर
कोल्हापूर : येथील श्री शाहू मार्केट यार्ड मधील फळे भाजीपाला मार्केटमध्ये या हंगामातील पहिली हापूस आणि पायरी आंब्याची आवक झाली. या आंब्याचा मुहूर्ताचा सौदा केला. त्यामध्ये हापूस आंब्याचा 5 डझनाच्या च्या पेटीस 25 हजार रुपये इतका म्हणजे प्रति डझन 5000 रुपये इतका विक्रमी दर मिळाला. तर पायरी आंब्याच्या 5 डझनाच्या पेटीला 16500 इतका म्हणजे प्रतिडझन 3300 रुपये इतका विक्रमी दर मिळाला.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती भरत पाटील भुयेकर, उपसभापती शंकर दादासो पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी येथील सलीम काजी यांच्या बागेतील हापूस आंब्याचा मुहूर्ताचा सौदा मार्केट यार्ड मधील दस्तगीर मूकबूल बागवान यांच्या अडत दुकानात काढण्यात आला. तर परवेज हाजी बादशहा बागवान यांच्या अडत दुकानात रत्नागिरी येथील रायबा तांबे यांच्या बागेतील पायरी आंब्याच्या मुहूर्ताचा सौदा करण्यात आला. हापूस आंब्याची 5 डझनाची पेटी जावेद बागवान यांनी 25000 रुपयेला तर पायरी आंब्याची 5 डझनाची पायरी आंब्याची पेटी आफान बागवान यांनी खरेदी केली. याशिवाय 6 डझनाच्या कच्च्या आंब्याची पेटी 11 711 रुपये इतक्या दराने विक्री झाली.
यावेळी बाजार समितीच्या वतीने आंबा उत्पादक शेतकरी आणि खरेदीदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे सचिव व सर्व संचालक उपस्थित होते.
