कोल्हापूरातील औद्योगिक समस्या सोडवण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक : मुख्यमंत्री शिंदे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा औद्योगिक विकास व विविध औद्योगिक प्रश्न सोडवण्याच्यादृष्टीने मुंबई येथे विविध खात्यांचे सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिकारी यांच्या समवेत लवकरच बैठक घेऊन सर्व समस्या सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरातील उद्योजकांना दिले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने कोल्हापूरात आले असता जिल्ह्यातील सर्व व्यापारी आणि उद्योजक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर [स्मॅक], कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन [गोशीमा], मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले फाईव्ह स्टार एमआयडीसी [मॅक] या औद्योगिक संघटनांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी येणाऱ्या अडचणी मांडल्या.
यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नाम. दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन,कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले, गोशीमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दलवाई, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, राजू पाटील, अतुल पाटील, सुरेश क्षीरसागर, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे तसेच उद्योजक उपस्थित होते.
