November 1, 2025

औद्योगिक विकास, अडचणींसाठी वन कॉन्टॅक्ट पॉईंट संकल्पना – अति. पो. अ. डॉ. बी. धीरज कुमार

0
IMG_20250422_194909

बैठकीत उद्योजकांच्या अडचणी आणि तक्रारींचा पाढा
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसी परिसरातील वाढती अतिक्रमणे; त्यावर न होणारी कारवाई, वारंवार होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या, या चोऱ्यांचा न होणारा तपास या प्रमुख अडचणी दूर व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पोलिस खात्याने ठोस कारवाई करावी अशी मागणी स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील यांनी केली. शिरोली औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणावरपोलिसांची मदत घेऊन लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांना सांगितले तर औद्योगिक विकास व अडचणींसाठी वन कॉन्टॅक्ट पॉईंट ही संकल्पना राबवावी असे
अति. पोलीस अधीक्षक डॉ. बी धीरज कुमार यांना सुचवले.
कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये कायदा सुव्यवस्था राखणे व औद्योगिक शांतता प्रस्थापित करणे करीता उपाययोजनांच्या अनुषंगाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, भा.पो.से. यांच्या अध्यक्षते खाली औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच उद्योजक, त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये कॉन्फरन्स हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय, कसबा-बावडा येथे बैठक संपन्न झाली.
या बैठकीत संघटना प्रतिनिधी आणि उद्योजकांनी अडचणी बरोबरच तक्रारींचाही पाढा वाचला.
पो. नि. प्रविण खानापुरे, डी.एस.बी. यांनी प्रास्ताविक केले.
या वेळी स्मॅक चे चेअरमन राजू पाटील म्हणाले की शिरोली औद्योगिक क्षेत्रांमध्ये बऱ्याच वर्षापासून  उद्योजकांना अतिक्रमणाचा फार मोठा त्रास होत आहे. सदरचे अतिक्रमण काढण्याकरिता एमआयडीसी कडे बऱ्याच वेळा मागणी करून सुद्धा आजपर्यंत त्याचेवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यासाठी एमआयडीसी व पोलीस विभाग यांच्या समन्वयातून ही अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. बार हे रस्त्यालगतच असल्यामुळे सायंकाळी जाण्या येण्याच्या रस्त्यावर बरीच गर्दी असते, या ठिकाणी बऱ्याच लोकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण केलेल्या लोकांनी या ठिकाणी हातगाड्या लावलेल्या असतात त्यामुळे वाहतुकीस संध्याकाळच्या वेळेस त्रास आहे. छोट्या मोठ्या चोऱ्या सुद्धा होतात.ऑगस्ट व डिसेंबर मध्ये दोन वेळा नेक्सस कटिंग सोल्युशन्स या दुकानात चोरी झाली पण या चोरीचा आज तगायत छडा लागलेला दिसत नाही. खरं म्हणजे अतिक्रमणाच्या मुळे या सर्व गोष्टी घडत असतात, या ठिकाणी अतिक्रमण केलेल्या लोकांचेच उठणे बसणे असल्यामुळे चोरीसारखे उद्योग होतात. हे लोक लक्ष ठेवून लोकांवरती हल्ला करतात या दृष्टीने काम होणे गरजेचे आहे
व्हाईस चेअरमन भरत जाधव म्हणाले की औद्योगिक क्षेत्रामध्ये तीन शिफ्ट मध्ये काम सुरु असते रात्री अपरात्री कामगारांना घेरावा घालून पैसे काढून घेतले जातात, यासाठी पोलीस प्रशासनाकडून गस्त घालणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिरोली औद्योगिक वसाहत ही महामार्गाला अगदी लागून आहे. आता तर एमआयडीसीचा सर्विस रस्ता महामार्ग रस्त्या लगत आल्याने येण्या जाणाऱ्या वाहतुकीस त्रास होतो, अपघात पण होतात.विशेष करून कोल्हापूर स्टील ते सकाळ प्रेस.  प्रवासासाठी वेळ लागत आहे. 
मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे मोहन कुशिरे म्हणाले की पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र हे मोठे असल्यामुळे पेट्रोलिंग नीट होत नाही. ठराविक ठिकाणीच पेट्रोलिंग ची गाडी फिरते. आतील बाजूस असणारे जी व डी ब्लॉकस मध्ये पेट्रोलिंग होत नाही. मॅक कडून त्यांना क्यू आर कोड्स देण्यात आलेले आहेत.नवीन पोलीस स्टेशन बांधण्याचे काम सुरू आहे त्याच्या सद्यस्थितीची माहिती देण्याची त्यांनी विनंती केली. महामार्गावर लक्ष्मी टेकडी येते सिग्नल नसल्यामुळे सकाळी ७ ते १० व संध्याकाळी ४ ते ८ या दरम्यान प्रचंड गर्दी होते. या ठिकाणी अपघात होतात कोंडी होते. सरासरी आठवड्याला एक अपघात या ठिकाणी घडतो त्यामुळे ट्रॅफिक पोलीस ची सक्त आवश्यकता आहे. त्यासाठी पाठपुरावा केला असता सदरचा विषय गोकुळ शिरगाव अथवा फाईव्ह स्टार एमआयडीसी या कोणत्या हद्दीमध्ये येतो हे सांगितले जात नसल्याची खंत व्यक्त केली. दिवसेंदिवस दुचाकी चोरींचे प्रमाण वाढले आहे. यासाठी ज्यादा स्टाफची नेमणूक करून लक्ष दिले पाहिजे.
संचालक भावेश पाटील म्हणाले पोलीस ठाण्यामध्ये उद्योजकांचा तक्रारी घेतल्या जात नाहीत. ही वृत्ती चुकीची आहे. पोलीस अधीक्षक स्तरावरून संबंधितांना याबाबत सूचना द्यायला हव्यात जेणेकरून याचा उद्योजकांना उपयोग होईल. किराणा माला दुकानांमध्ये पडद्याआड देशी दारूची विक्री होत शेजारीच मटका घेतला जातो या मुळे पगार झाल्या नंतर कामगारांकडून यावर खर्च केला जातो.या मुळे त्यांचा रजा पडतात व उद्योजकांना याचा त्रास होतो याकडे लक्ष दिले पाहिजे.
हलकर्णी एमआयडीसी चे चेअरमन विलास देसाई म्हणाले की सदर औद्योगिक क्षेत्रामध्ये अवैध धंदे सुरू आहेत. त्यास आळा घालणे गरजेचे आहे. एमआयडीसी ने जागा घेतलेल्या शेतकऱ्यांकडून सुद्धा उद्योजकांना बांधकाम करण्यासाठी त्रास होत आहे. शेतकरी जमीन कसत असल्यामुळे ताबा घेते वेळी विरोध करतात. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याकडून मदत करण्यात यावी.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता इराप्पा आ. नाईक म्हणाले हातगाडी वगैरे लावून अतिक्रमण करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी आठवड्यातून एकदा पोलीस कॉन्स्टेबल मिळावा. शिरोली औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणावर लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे. तेथील फेरीवाल्यांचे जय महाराष्ट्र हे असोसिएशन कोर्टात गेल्याने सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे अतिक्रमण काढण्यास वेळ लागत आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार म्हणाले की सदरच्या बैठकीमध्ये व्हि. सी. च्या माध्यमातून उपस्थित असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या या अडचणींकडे पोलीससिंग द्वारे लक्ष देणे गरजेचे आहे. आपापल्या स्तरावर बैठक आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या. या बैठकीमध्ये स्वतः आढावा घेऊन संबंधितांना सूचना द्याव्यात व त्याचा पाठपुरावा करावा. सूचनांची पूर्तता करण्याची जबाबदारी ही आपल्यावरच आहे असे ते म्हणाले. औद्योगिक विकास व अडचणींसाठी वन कॉन्टॅक्ट पॉईंट ही संकल्पना राबवावी. औद्योगिक व सामुदायिक अडचणी ह्या काही वेगळ्या नाहीत. या अडचणी दूर केल्यास समृद्धी वाढेल, लोकांना खूप संधी मिळतील. या सर्व बाबींचे पुनरावलोकन करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच महिन्यातून अथवा दोन महिन्यातून एक बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांनी आभार मानले. ते म्हणाले की त्यांनी ही बैठक आयोजित केल्याबद्दल एमआयडीसी व उद्योजकांकडून पोलीस प्रशासनाचे आभार मानतो. कोल्हापूरा मध्ये एक उद्योग स्नेही वातावरण आहे. औद्योगिक संघटना व उद्योजक सुद्धा सक्रिय आहेत. बरेच उद्योजक हे स्थानिक आहेत. कोल्हापुरी पुरोगामी असल्यामुळे येथे खंडणी इत्यादी सारखे प्रकार नाहीत. अतिक्रमण , ट्रॅफिकिंग , अवैध धंदे याबाबतच्या तक्रारी आहेत. शासनाच्या जीआर प्रमाण समिती स्थापन करण्यात आलेली आहे व या समितीची पहिली बैठक संपन्न झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅक चे चेअरमन राजू पाटील, व्हाईस चेअरमन भरत जाधव, खजानिस बदाम पाटील, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन गोशीमा चे अध्यक्ष स्वरूप कदम, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, ऑ. सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, ऑ. खजानिस अमृतराव यादव, संचालक भावेश पटेल, संजय जोशी, एमआयडीसी हलकर्णी असोसिएशनचे चेअरमन विलास देसाई, व्हाईस चेअरमन वसंत निटूरकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, कार्यकारी अभियंता इराप्पा आ. नाईक, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी विकास कुलकर्णी, उप रचनाकार अभिजीत कुलकर्णी, कागल राधानगरी चे महसूल विभागाचे एसडीओ प्रसाद चौगुले, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे सरकारी कामगार अधिकारी यशवंत हुंबे उपस्थित होते. व्हि. सी. च्या माध्यमातून उपविभागीय पोलिस अधिकारी सुद्धा उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page