शिरोली एमआयडीसीत सीसीटीव्हीसह सक्षम सुरक्षा यंत्रणा आवश्यक : सुरेंद्र जैन
शिरोली : शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये होणाऱ्या चोऱ्या थांबवण्यासाठी सीसीटीव्हीसह अद्यावत, सक्षम सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्याची गरज आहे. सर्व कंपन्यांनी याची दक्षता घ्यावी!. असे आवाहन स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी केले. शिरोली एमआयडीसी नुकत्याच झालेल्या ६० लाखाच्या चोरीच्या पार्श्वभूमीवर स्मॅक संचालक, संबंधित शासकीय आणि पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी सुरेंद्र जैन म्हणाले की राज्याच्या उद्योग मंत्रालयाच्या वतीने सर्व औद्योगिक वसाहती सीसीटीव्ही च्या कक्षेत आणण्याबाबत निर्णय घेतला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कारवाई व्हावी यासाठी स्मॅकच्यावतीने पाठपुरावा केला जाईल. प्रत्येक कंपनीची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे पण काही ट्रेडिंग कंपन्या आणि बंद कारखाने या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नसल्याने अशा ठिकाणी चोऱ्या होतात. त्यासाठी संपूर्ण औद्योगिक वसाहत सीसीटीव्हीच्या कक्षेत आणणे गरजेचे आहे.
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी चोऱ्या होऊ नये त्यासाठी पोलीस खाते सतर्क आहे. तसेच झालेल्या चोरीचा तपास पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्यामार्फत सुरू आहे. लवकरच या चोरीचा छडा लागेल असा विश्वास व्यक्त केला.
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर – स्मॅक द्वारा शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या चोरीच्या अनुषंगाने आज बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस स्मॅकचे संचालक शेखर कुसाळे, निमंत्रित सदस्य प्रकाश खोत, किरण चव्हाण, दीपक घोंगडी, अनिल दटमजगे, शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता स्थापत्य अजयकुमार रानगे, सहा. अभियंता निलेश जाधव, अनुरेखक रामचंद्र गुरव, महावितरण शिरोली एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता अविनाश चौगुले,आदी उपस्थित होते.
