कॉंग्रेेसला घोटाळ्यांची परंपरा, भाजपकडून विकासाला प्राधान्य, खा. महाडिक
Vijay Powar December 14, 2023 0
कोल्हापूर : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देऊन खा. धनंजय महाडिक यांनी कॉंग्रेेसला घोटाळ्यांची परंपरा आहे तर भाजपकडून विकासाला प्राधान्य दिले जाते असे सांगत कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराबद्दल टीकास्त्र सोडलं.खा. धनंजय महाडिक यांच्या निधीतून तसंच जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजित कदम यांच्या पुढाकारानं कोल्हापूर शहरातील मुक्त सैनिक वसाहत आणि कसबा बावडा इथं विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी खा. महाडिक म्हणाले बोफोर्स घोटाळ्यापासून ते कोळसा घोटाळ्यापर्यंत आणि टेलिकॉम घोटाळ्यापासून ते अगदी गरीबी हटाव मोहीमेपर्यंत कॉंग्रेसने देशाची फसवणूक आणि लुट केली आहे. खासदार धिरज साहू यांच्याकडे ३०० कोटी रूपयांपेक्षा अधिक रोकड सापडते, एकप्रकारे त्यांनी कॉंग्रेस पक्षाची घोटाळ्याची परंपरा कायम ठेवली आहे, या घोटाळेबाज पक्षाचे नेतृत्व करणारे आता दिशाहीन झाले आहेत, गेल्या १५ वर्षात कोल्हापूर महापालिकेत सत्ता असणार्या कॉंग्रेस नेत्यांनी शहराचा विकास नव्हे, तर भकास केला, अशी आ. सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता टिकाही महाडिक यांनी केली.
खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या वर्षभरात कोल्हापूरच्या विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध केला आहे. प्रभाग क्र.१९, मुक्त सैनिक वसाहत येथे जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम यांच्या पाठपुराव्यातून, खासदार महाडिक यांनी या प्रभागासाठी तत्कालिन नगरसेवक राजसिंह शेळके यांना ६० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून वाडकर निवासस्थान ते देवधर हॉस्पिटल परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला. या प्रभागात क्रीडांगण विकसीत व्हावे, तसेच बहुउद्देशीय हॉल बांधून मिळावा, अशी अपेक्षा राजसिंह शेळके यांनी व्यक्त केली. त्याला खासदार महाडिक यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. तर माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी महापालिकेतील कॉंग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारी कारभारावर टीका केली. दरम्यान कोल्हापूर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. शहराच्या रस्ते विकासासाठी यापूर्वी १०० कोटी रूपये मंजूर केलेे आहेत. येत्या काही दिवसात आणखी ९० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होईल, असे खासदार महाडिक यांनी जाहीर केले. यावेळी भगवान काटे, राजू निपाणी, शेखर खापणे, निवास जाधव, डॉ. जे.पी.पाटील, वैभव माने, प्रा. एकनाथ काटकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. त्यानंतर कसबा बावडा इथल्या डॉ.डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या पिछाडीस असणार्या रस्ते विकास कामाचा शुभारंभ, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि सत्यजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या प्रभागाच्या विकासासाठी, खासदार महाडिक यांच्याकडून १ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यावेळी बोलताना खासदार महाडिक यांनी कॉंग्रेसचे आमदार ॠतुराज पाटील यांच्यावर टीका केली. उजळाईवाडी विमानतळ परिसरातील रस्ते विकासासाठी २७ कोटी रूपये आपणच आणले आहेत, असा डांगोरा आमदार पाटील पिटतायत. प्रत्यक्षात या निधीचा प्रस्ताव माजी आमदार अमल महाडिक यांनी शासनाकडे सादर केला होता. तरीही आमदार पाटील काम न करताच श्रेय लाटू पाहतायत, असा टोला हाणला. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना, कॉंग्रेसचे आमदार आपणच हा निधी आणला, असा दावा कसा करू शकतात, असा सवाल खासदार महाडिक यांनी उपस्थित केला. यावेळी प्रदिप उलपे, विजय चव्हाण, दिलीप उलपे, नारायण चव्हाण, सागर खामकर, चंद्रकांत घाटगे यांच्यासह बावडा परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Post Views: 91
