मादक पदार्थ विक्री, टोळी युद्ध यामुळे शिरोली परिसर दहशतीखाली
शिरोली : शिरोली परिसरात एकाच दिवशी दोन ठिकाणी तुंबळ मारामाऱ्या झाल्या. एक किरकोळ कारणावरून तर एक पुर्ववैमनस्यातून. त्यांचे स्वरूप मात्र गंभीर होते. दोन्ही ठिकाणी तरुणांची टोळकी, हत्यारांचा वापर, जीव घेणे हल्ले, महागड्या गाड्यांची तोडफोड. यामुळे घटनेच्या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. प्रकरणे पोलीस ठाण्यात गेल्यानंतर कारवाई झाली पण या निमित्ताने वारंवार घडणाऱ्या अशा घटनां बरोबरच. गावठी दारू अड्डे, गांजा, ड्रग, गुटखा, मावा, तंबाखू आदी मादक पदार्थांची राजरोस विक्री, सेवन आणि यातून बनलेल्या गुन्हेगारी टोळ्या. त्यांचा आक्रमक पवित्रा शिरोली परिसरात चिंतेचा विषय बनला आहे.
शिरोली एमआयडीसीत कारखानदार असलेले रोहीत बोडके आणि अमर पाटील यांचे एकमेकाच्या शेजारीच कारखाने आहेत. दारात फोनवर बोलत असताना एकाने सहज ‘बाजूला उभा राहून बोल’ असे म्हंटले. त्यातून किरकोळ वाद झाला. एकाने कारखान्यातील कामगार बाहेर बोलवले आणि समोरच्याला चोपले. त्यानेही आपले मित्र, आणि पोरांचे टोळके बोलवले आणि त्याला कारखान्यात घुसून बडवले. अलिशान गाडयाची आणि कारखान्याची तोडफोड केली. प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. एकमेकांवर गुन्हे दाखल झाले. एकमेका शेजारी उद्योग व्यवसाय करणाऱ्यांनी किरकोळ कारणावरून असे मारामारीचे प्रकार करणे याबाबत जेष्ठ उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली.
त्याच दिवशी शिरोली गावातील माळवाडी भागात रात्री दहाच्या दरम्यान दिगंबर कांबळे आणि त्यांच्या पत्नीवर एका टोळक्याने भररस्त्यात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. इतकेच नव्हे तर ‘तुला आता संपवणारच’ अशीही भाषा करीत वार केले. यामध्ये हातानी बचाव करताना दिगंबर कांबळे यांची बोटे तुटली. या दांपत्याने झेरॉक्स सेंटरच्या शेडचा आसरा घेताला. घाव वर्मी लागला असता तर त्या ठिकाणी खून पडला असता. हा हल्ला पूर्ववैमनस्यांतून झाल्याचे पोलीसांनी सांगीतले. पूर्ववैमनस्य कसले तर गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत दोन मंडळात झालेला वाद.
अशाच दोन गटातील मारामाऱ्या गेल्या काही महिन्यात अनेक झाल्या आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुण इंजिनियरच्या दारात एक टोळके हुल्लडबाजी करीत होते. त्यांना ‘इथं दंगा करू नका’ असे सहज म्हंटले तर त्या टोळक्याने त्या इंजिनियरला बेदम चोपले. असेच पैशाच्या वादातून दोन गटात मारामारी झाली. मारामारी करणारे एक टोळके गारगोटी जवळ एका हॉटेल मध्ये लपले. दुसरी टोळी माग काढत तेथे पोहचली. यामध्ये थेट बेकायदेशीर गावठी पिस्तुलातून गोळीबार झाला. हेही प्रकरण पोलिस ठाण्यात गेले यातील काहीजण जेलमध्येही गेले. अशाच शिरोलीतील माळवाडी, सावंत कॉलनी, विलासनगर, शिरोली फाटा, सांगली फाटा, गावभाग याठिकाणी झालेल्या मारामाऱ्या, तरुणांची टोळकी, हत्यारांचा वापर. यामुळे तयार झालेल्या काही टोळ्या, तरुण, आणि त्यांचे म्होरके चर्चेत आहेत.या
टोळ्या तयार होण्याचे मुळ मात्र या परिसरातील गावठी दारू अड्डे, याच ठिकाणी मिळणारे गांजा, ड्रग, तसेच अनेक पानपट्टी, किराणा मालाच्या दुकानात मिळणारा गुटखा, मावा, मादक पदार्थांचा गोळ्या, स्क्रॅप चोरी, त्यातील पैशांचा व्यवहार आणि खाजगी सावकारी असे राजरोस चालणारे बेकायदेशीर धंदे हे आहे. मिसरूडही न फुटलेल्या तरुणानां या मादक पदार्थांचे व्यसन तर लावले जात आहेच. पण काही तरुणांना या मादक पदार्यांच्या विक्रीच्याही कामाला लावले आहे. यातून सहज मिळणारा पैसा आणि फुकटचे व्यसन यामुळे टोळ्या तयार होऊन सर्वसामान्य नागरीकांना उपद्रव वाढत आहे.
हे सर्व प्रकार आणि बेकायदेशीर धंदे पोलीसांना माहीतच नाहीत असे नाही. कारण स्थानिक पोलिसांचा या परिसरातील वावर आणि अशाच धंद्यातील म्होरक्यांच्या गाठीभेटी हा चर्चेचा विषय आहे.. मादक पदार्थांबाबत वरून येणाऱ्या आदेशानुसार होणाऱ्या कारवाया किती जुजबी असतात ते कारवाई वरून स्पष्ट होते. गुटख्याच्या पुड्या विकणाऱ्या पानपट्टयावर कारवाया होतात. पण त्यांना पुरवठा करणारे. वहातूक करणारे. साठा करून ठेवणारे यांच्याकडे तसेच गांजा, मादक गोळ्या, ड्रग्ज विक्री करणाऱ्यांकडे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष अर्थपूर्ण वाटाघाटीची खात्रीच देते. याशिवाय यातील म्होरक्याचे राजकिय लागेबांधे, कारवाईनंतर पोलीस ठाण्यात होणारा राजकिय हस्तक्षेप याचीही चर्चा होत असते. यामुळेच शिरोली परिसरातील या उपद्रवी टोळक्यांचा कोठे, कधी, कोणाला त्रास होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे या टोळक्याच्या दहशतीखालीच शिरोली परिसर असल्याचे चित्र आहे. हे प्रकार समूळ नष्ट व्हावे यासाठी पोलिस आणि संबधीत खात्याकडून प्रयत्न व्हावे अशी सर्वसामान्य नागरीकांची मागणी आहे.
