November 3, 2025

महाराष्ट्रातील भीषण वास्तव दर्शन घडविणारा ‘नतमस्तक’ चित्रपट

0
IMG_20251103_133913

कोल्हापूर-एका अनोख्या विषयावर आधारलेला ‘नतमस्तक’ हा मराठी चित्रपट बनविण्यात येत आहे. समाजाभिमुख चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांचा कौल मिळाला आहे. नुकतीच घोषणा करण्यात आलेला ‘नतमस्तक’ या चित्रपटात नेमके काय पाहायला मिळेल याची उत्सुकता वाढविण्याचे काम नुकतेच प्रदर्शीत झालेले पोस्टर करीत आहे.
निर्माते रमेश वामनराव शिंदे यांनी आर. एस. गोल्डन ग्रुप मुव्ही मेकर्सच्या बॅनरखाली ‘नतमस्तक’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. रमेश शिंदे हे पुण्यातील यशस्वी उद्योजक असून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. आजवर वेगवेगळ्या विषयांवर लघुपट तसेच चित्रपट बनवत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांना गवसणी घालणारे दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे ‘नतमस्तक’चे दिग्दर्शन करीत आहेत. दिग्दर्शक महेश काळे यांच्याबाबत सांगायचे तर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रुपया’ या लघुपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. याखेरीज त्यांच्या ‘घुमा’ चित्रपटाने महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार पटकावला आहे. महेश काळे यांचा ‘नतमस्तक’ हा एका वेगळ्या विषयावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पहिले वहिले पोस्टर लाँच करून ‘नतमस्तक’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पोस्टरवर दुष्काळग्रस्त भागातील भेगाळलेल्या शेतात असलेल्या एका विहिरीत पेटलेली आग पाहायला मिळते. एक तरुणी त्या विहिरीच्या दिशेने जात असून, बाजूला एक गाय उभी असल्याचे पोस्टरवर पाहायला मिळते. पोस्टरवरील चित्र महाराष्ट्रातील भीषण वास्तवाचे दर्शन घडविणारे आहे. हा चित्रपट पुढल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘नतमस्तक’बाबत दिग्दर्शक महेश काळे म्हणाले की, चित्रपटाचे पोस्टर खऱ्या अर्थाने उत्सुकता वाढविणारे आहे. पोस्टरवर दाखविण्यात आलेले चित्र काल्पनिक नसून, भयाण सत्य कथन करणारे आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबतची माहिती सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली तरी लवकरच ती रिव्हील करण्यात येणार आहे. त्यासोबतच कलाकारांच्या नावांची घोषणाही करण्यात येईल. हा केवळ मनोरंजनपर चित्रपट नसून, सामाजिक प्रबोधन करत समाजाला नवी दिशा देण्याचा हा एक प्रयत्न आहे. निर्माते रमेश शिंदे यांना चित्रपटाचा विषय आवडल्याने ‘नतमस्तक’सारखा चित्रपट बनवणे शक्य झाल्याचेही काळे यांनी सांगितले.
‘नतमस्तक’ हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारलेला आहे. समाजसेवक असल्याने निर्माते रमेश शिंदे यांना ‘नतमस्तक’चा विषय आणि आशय भावला आणि त्यांनी निर्मितीची धुरा सांभाळली. महिला सबलीकरण, व्यवसाय जागृती, तरुणांना उद्योग चालना, गोशालेच्या माध्यमातून प्राणी मुक्ती-दया उपक्रम, अनाथ मुलांना मदत, शालेय शिक्षणासाठी हातभार लावण्याचे काम करतात. उद्योग क्षेत्रात वाटचाल करत असताना आजूबाजूची परिस्थिती पाहता समाजसेवेत अग्रेसर झालेल्या रमेश शिंदे यांनी आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून ‘नतमस्तक’ होत हा चित्रपट करीत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page