कोल्हापुरातील गुन्हेगारी, बिघडलेल्या कायदा, सुव्यस्थेची निलम गोऱ्हेनी घेतली गंभीर दाखल
कोल्हापूर : कोल्हापूर ही ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरेची नगरी आहे. येथे शांतता व कायदा सुव्यवस्था धोक्यात येणे असह्य व अस्वीकार्य आहे. म्हणूनच, यापुढील काळात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस, कठोर व तातडीची कारवाई करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी आपण याबाबत तातडीने ठोस पावले उचलावी, आणि या सुचनांच्या पार्श्वभुमीवर आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल व गुन्हेनिहाय संकलित केलेला एकत्रित अहवाल कृपया पुढील 15 दिवसात माझ्या कार्यालयास पाठवावा अशा सूचना विधनपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना देऊन याबाबत कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांचेशी चर्चाही केली.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या डॉ. गोऱ्हे यांनी कोल्हापूरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांची गंभीर दाखल घेतली. उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी गेल्या काही दिवसात कोल्हापूर शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडानी केलेले हल्ले, दहशती कारवाया यांचे संदर्भही अधोरेखित केले.
यामध्ये जुना राजवाडा पोलीस स्टेशन हद्दीत शालिनी पॅलेस परिसरातील बेकरीवर हल्ला. करवीर पोलीस हद्दीत कळंबा येथे एका खाजगी आरामबसवर हल्ला.
करवीर पोलीस स्टेशन हद्दीत विश्वजीत फाले यांच्यावर जीवघेणा हल्ला. करवीर पोलीस पोलीस हद्दीतआदित्य गवळी व त्याच्या साथीदारांनी महेश राख या तरूणाचा केलेला खुन. राजारामपुरी पोलीस स्टेशन हद्दीत हेरवडे नावाच्या युवकावर खुनी हल्ला. गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीत उजळाईवाडी बेकरीवर हल्ला
वरील हिंसक घटनेस जबाबदार सर्व आरोपींना तत्काळ अटक करुन पुढील कायदेशीर कार्यवाही करवी अशा सूचना दिल्या. तसेच असे प्रकार रोखण्यासाठी शहरात पोलिस गस्त वाढवून, विशेष पथके संवेदनशील भागात कायमस्वरूपी तैनात करावीत. ड्रग्स विक्री व सेवनाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेऊन त्यामागील संपूर्ण गुन्हेगारी साखळी उद्ध्वस्त करावी. खून, खुनाचे प्रयत्न व तलवारीने दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा होईल याची खात्री द्यावी. सीसीटीव्ही नेटवर्क आणि आधुनिक नियंत्रण व्यवस्था अधिक सक्षम करून निगराणी वाढवावी.
विद्यार्थ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र व विशेष सुरक्षा मोहिमा राबवाव्यात. नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवून, जलद व प्रभावी प्रतिसाद देण्याची कार्यपद्धती लागू करावी. अशा उपाय योजना सुचवल्याआणि त्याबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
