शिरोली परिसरात कायदा, सुव्यवस्था आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न?
शिरोली : शिरोली परिसरात गणेश उत्सव काळात दोन गटातील मंडळातील वाद, मारामाऱ्या, गोळीबार, हद्दपार कारवाईतील गुंडांचा मोकाटपणे वावर असे प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बारा गावे, चार वाड्यामध्ये झालेल्या गणेशोत्सवाच्या काळात शिरोली, मौजे वडगाव, टोप, शिये फाटा परिसरात घडलेल्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेशोत्सव सुरू झाला असताना शिये फाटा येथे टोप, गंगारामनगर येथील वडार समाजातील दोन गटात वाद झाला. गणेश शेलार आणि विजय पवार यांच्यातील वादाचे पर्यावसन दोन गटातील मारामारीत झाले. यातून गणेश शेलार यांनी एकावर थेट नेम धरून आपल्या जवळील पिस्तूलातून गोळीबार केला. प्रसंगावधान राखून एकाने गणेश शेलारचा हात वर उचलला आणि पिस्तुलातील तीन गोळ्या हवेत उडाल्या आणि पुढील अनर्थ टाळला. हा गोळीबार होण्यापूर्वी शिये फाटा येथे कितीतरी वेळ हाणामारी आणि गोंधळ सुरू होता. पण गोळीबार झाला आणि पोलिसांना खडबडून जाग आली. पोलीस घटनास्थळी धावले. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू हे देखील घटनास्थळी आले. त्यानंतर आठ जणांवर कारवाई केली.
गणेश आगमनाच्या मिरवणुकीत शिरोलीतील दोन आणि मौजे वडगावमधील दोन मंडळावर ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. अनेक मंडळांकडून हा प्रकार घडला पण चारच मंडळावर गुन्हे दाखल केले. तरही त्या मंडळांची नावे माध्यमांना देणे पोलीस ठाण्यातून खुबीने टाळले. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक खून, मारामाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्यावर दरवर्षी हद्दपारची कारवाई होते. यावर्षीही 34 गुंडांवर हद्दपारची कारवाई झाली. पण गणेशोत्सव सुरू होऊन काही दिवस झाल्यानंतर या गुंडांना कारवाईची नोटीस लागू करण्यात आली. तेही परिसरात गोळीबाराचा गंभीर प्रकार घडल्यानंतर. तरीही या हद्दपार कारवाईतील काही गुंड गावातील डिजिटल फलकांवर झळकत होतेच. याशिवाय प्रत्यक्ष मंडळाच्या कार्यक्रमात, सहभागी झाल्याचे, सत्कार करताना, मिरवणुकीत नाचताना आणि गावातून बिनधास्त फिरताना दिसत होते. ते पोलिसांना का दिसत नव्हते हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत होता.
शिरोलीतील माळवाडी भागातील एका मंडळात वादावादी, मारामारी झाली. हत्यारांनी वार झाले. यामध्ये तीन-चार जण गंभीर जखमी झाले. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद झाले. पण छोटे-मोठे वाद आणि मारामाऱ्या इतर काही मंडळांच्या कार्यकर्त्यात झाल्या. त्याची चर्चा गावभर झालीच. गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादेची उल्लंघन अनेक मंडळांनी केले. मिरवणूक झाल्यानंतर शिरोली, मौजे वडगाव, भुये गावातील 84 मंडळावर गुन्हे दाखल केले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिसत होते पोलिसांना मात्र दिसत नव्हते की पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
