कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रारूप प्रभाग रचना जाहीर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार प्रशासक तथा आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी आज प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली. आज (दि.3 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये नागरिकांना प्रभाग नकाशे, व्याप्ती व दिशा दर्शविणारी संपूर्ण माहिती प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली.
प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धी 1. स्थायी समिती हॉल, मुख्य इमारत, 2. प्रभाग समिती कार्यालय क्र.1, गांधी मैदान, 3. प्रभाग समिती कार्यालय क्र.2, शिवाजी मार्केट, 4. प्रभाग समिती कार्यालय क्र.3, राजारामपुरी, 5. प्रभाग समिती कार्यालय क्र.4, कावळा नाका तसेच, कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील ही माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या प्रारूप प्रभाग रचनेबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना दिनांक 3 ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीत दुपारी 3 वाजेपर्यंत स्थायी समिती हॉल, महानगरपालिका, मेन बिल्डिंग येथे स्वीकारल्या जाणार आहेत. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीकरिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे महानगरपालिकेकडून कळविण्यात येणार आहे.
नगरसेवक पदाच्या ८१ जागेसाठी चार सदस्यीय १९ आणि पाच सदस्यीय १ असे एकूण २० प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. कोल्हापूर शहराच्या नव्याने निश्चित होणाऱ्या प्रभाग नागरीकांना प्रचंड उत्सुकता लागुन राहीली होती. आज दुपारी आयुक्त के मंजूलक्ष्मी यांनी शहराची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली. शहराच्या उत्तरेकडील कसबा बावडा येथून १नंबरच्या प्रभागाची सुरवात करण्यात आली असून दक्षिणेकडील कळंबा जवळील महापालिकेच्या हद्दीपर्यंत २० प्रभागांची रचना केली आहे. १ ते १९ प्रभाग ४ सदस्यीय आहेत तर शेवटचा २० वा प्रभाग ५ सदस्यीय आहे.
प्रभाग रचनेसाठी शहराची २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. ४ सदस्यीय प्रभाग रचनेसाठी २५ हजार ७०० ते २८ हजार लोकसंख्या तर ५ सदस्यीय प्रभागासाठी ३२ हजार ३०० लोकसंख्या गृहीत धरली आहे.
