डॉ. पद्मारेखा जिरगे यांच्या आंतरराष्ट्रीय शोधनिबंधाचे मलेशियात सादरीकरण
कोल्हापूर : इंडियन सोसायटी फॉर फर्टिलिटी प्रिझर्व्हेशन (ISFP) च्या अध्यक्षा डॉ. पद्मारेखा जिरगे या १ आणि २ ऑगस्ट २०२५ रोजी मलेशियामध्ये होणाऱ्या “पाचव्या आशियन सोसायटी फॉर फर्टिलिटी प्रिझर्व्हेशन (ASFP) काँग्रेस” मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत दोन महत्त्वपूर्ण शोधनिबंध सादर करणार आहेत. ही कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी आहे.
ही परिषद आशिया खंडातील वंध्यत्व आणि प्रजननक्षमता संवर्धन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आघाडीच्या तज्ज्ञांची व्यासपीठ असून, विविध देशांतील वैद्यकीय संशोधक, शास्त्रज्ञ आणि क्लिनिशियन येथे एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करतात.पहिल्या शोधनिबंधाचा विषय ‘कर्करोगातून बरे झालेल्यांचे जीवन’हा आहे.
या सत्रात डॉ. जिरगे कर्करोगातून बरे झालेल्या रुग्णांना त्यांच्या आयुष्यात पुन्हा स्थैर्य मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वांगीण आधारव्यवस्थेवर– वैद्यकीय तज्ज्ञ, परिचारिका, समाज व वंध्यत्व तज्ज्ञांची भूमिका – सखोल मांडणी करतील. त्या या रुग्णांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सशक्त करणारी सिस्टिम उभारण्यासाठी तज्ज्ञांकडून अपेक्षित असलेली संवेदनशीलता अधोरेखित करतील.
दुसऱ्या शोधनिबंधामध्ये त्या भारतभर करण्यात आलेल्या ‘नॉलेज ॲटीट्यूड अँड प्रॅक्टीस’ (KAP)” सर्वेक्षणाचे निष्कर्ष मांडणार आहेत. या अभ्यासात कर्करोग सर्जन्स, आँकोलॉजिस्ट आणि वंध्यत्व तज्ज्ञांमध्ये फर्टिलिटी प्रिझर्व्हेशनविषयी असलेले ज्ञान, दृष्टिकोन व सराव याचा अभ्यास करण्यात आला आहे. विशेषतः कोल्हापूरमधील कर्करोग तज्ज्ञांनी या अभ्यासात मोलाचे योगदान दिले आहे या संशोधनाचे निष्कर्ष वैद्यकीय व्यावसायिकांना अधिक प्रभावी सेवा देण्यास मार्गदर्शक ठरतील. विशेषतः कर्करोगावर उपचार घेत असलेल्या आणि पुनरुत्पादनक्षमतेबाबत निर्णय घेणाऱ्या रुग्णांसाठी.
डॉ. जिरगे यांचा या क्षेत्रातील अनुभव, संशोधनात्मक दृष्टिकोन आणि नेतृत्वक्षमता भारतातील वंध्यत्व उपचार व्यवस्थेला एक नवा आयाम देत आहे. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय सहभागामुळे भारतातील फर्टिलिटी प्रिझर्व्हेशनच्या कार्याला जागतिक पातळीवर अधिष्ठान मिळत आहे.
