‘वेल डन आई’मध्ये विशाखा सुभेदारची धम्माल
कोल्हापूर-शिकलेली किंवा अशिक्षीत… मॅाडर्न किंवा साधीभोळी… शांत किंवा तापट… कशीही असली तरी आई ही आई असते. निसर्गाने आईला पुनर्निमितीचे वरदान दिले आहे. त्याच कारणामुळे देवानंतर पहिले स्थान आईचे मानले जाते. आता आईवर आधारलेला एक नवा कोरा विनोदी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेल डन आई’ असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. हा चित्रपट १४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
दीपाली प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘वेल डन आई’ चित्रपटाची निर्मिती सुधीर पाटील यांनी केली आहे. शंकर अर्चना बापू धुलगुडे यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून, दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटात एका अशा आईची गोष्ट पाहायला मिळणार आहे, जी आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करणारी आहे. मुलाच्या सुखासाठी नवऱ्याशी, जगाशी वैर घेणारी आहे. घरसंसार चालवण्यासाठी खानावळीत काम करण्यासोबतच इतरही छोटे व्यवसाय करणारी ही आई जगातील असंख्य आईंचे प्रतिनिधीत्व करणारी आहे. आईची धमाल व्यक्तिरेखा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाद्वारे घरोघरी पोहोचलेली विशाखा सुभेदार यांनी साकारली आहे. यात विशाखाच्या जोडीला विजय निकम, आयुष पाटील, जयवंत वाडकर, सिमरन खेडेकर, बीना सिद्धार्थ, तन्वी धुरी, विपुल खंडाळे आदी कलाकार आहेत. .
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संदीप गचांडे आणि शंकर धुलगुडे यांनी केले आहे. छायांकन रंजीत साहू यांनी केले असून संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. संदीप गचांडे यांच्या लेखणीतून साकारलेली गीते संगीतकार निशाद गोलांबरे यांनी संगीतबद्ध केली आहेत. राज्यपाल सिंह यांनी कार्यकारी निर्मात्याची भूमिका चोख बजावली असून काफिल अन्सारी यांनी प्रोडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे. पार्श्वसंगीत – ऍग्नेल रोमन, कलादिग्दर्शन – देवेंद्र तावडे यांचे आहे.
