महापालिकेतील अधिकऱ्यांनीच उकळले लाखो रुपये : ठेकेदाराचा नावांसह आरोप
कोल्हापूर : महानगर पालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या विकास कामाची बीले मंजूर करण्यासाठी संबधित खात्यातील क्लार्क पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी लाच म्हणून लाखो रुपये घेतल्याचा आरोप एका ठेकेदाराने करताना याबाबत कोणत्या दराने, कोणाला, किती, कोठे आणि कसे पैसे दिले याची सविस्तर माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. कोट्यावधीची गुंतवणूक, दर्जेदार कामे, लाचेची पुर्तता करूनही अधिकारी त्रास देत असल्यामुळे आता आत्महत्या हाच पर्याय असल्याचा इशारा या ठेकेदाराने दिला आहे. या प्रकाराने कोल्हापूर शहर आणि जिल्हयात खळबळ माजली आहे.
श्रीप्रसाद संजय वराळे असे नाव असलेल्या या ठेकेदाराने तब्बल तीन पानी पत्रक काढले आहे. क॥ बावडा येथील प्रभाग क्र. २ मधील ड्रेनेज पाईप लाईनच्या कामाचे रनिंग बील ८५ लाख रुपये घेतल्याचा आरोप या ठेकेदारावर करण्यात आला होता. त्यावरून त्यानी खुलासा करताना कामाचे बील जीएसटीसह ७२ लाख १६ हजार होते. ते मंजूर करून बँकेच्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम ६७ लाख ५८ हजार रुपये इतके जमा झाले. पण यासाठी संबधीत खात्यातील कर्मचाऱ्यांना लाखाला १०० आणि २०० रु., कनिष्ठ आणि वरिष्ठ अभियंत्याना एकूण रक्कमेच्या १ आणि २ टक्के प्रमाणे रोख पैसे दिल्याचे तर एका महिला कर्मचाऱ्यास ऑन लाईन रक्कम दिल्याचे सांगीतले. यामध्ये कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड १ लाख २० हजार, उपशहर अभियंता कांबळे ६० हजार, तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत १ लाख २० हजार, अकौऊंट विभाग क्लार्क नाईक, अधीक्षक सूर्यवंशी ६ हजार, ऑ डिट विभागामधील लिपिक यांना लाखाला शंभर, लेखापरीक्षक परीय यांना लाखाला दोनशे, मुख्य लेखापरीक्षक मिसाळ यांना लाखाला दोनशे याप्रमाणे एकूण ३० हजार रुपये दिले आहेत. तर तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना ६० हजार रुपये दिले. याशिवाय शहर अभियंता नेत्रदीप सरनीचत यांनी मला ब्लैक लिस्ट न करण्यासाठी अडीच लाख रुपये घेतले असल्याचे आरोप वराळे यांनी पत्रकात केला आहे. कावळा नाका परिसरात रोख स्वरुपात त्यांना ही रक्कम दिली असल्याचे म्हंटले आहे. मनपात आजपर्यंत केलेल्या सात ते आठ कोटींच्या कामाची बिले काढण्यासाठी आत्तापर्यंत मनपा अधिकाऱ्यांना टक्केवारीच्या स्वरुपात ६० ते ६५ लाख रुपये दिले असल्याचे वराळे यांनी पत्रकात म्हटले आहे.महापालिकेमध्ये २०१७ पासून काम करतोय माझे कसबा बावड्यामधील पॅव्हेलियन ग्राऊंड विकसित करणे, कसबा बावडा स्मशानभूमी, गटरची कामे यांची बिले काढतानाही मी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना बिल काढण्यासाठी त्यांनी मागणी केलेल्या पैशाची पूर्तता केली असल्याचे वराळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
कोल्हापूर महानगर पालिकेत झालेले अनेक घोटाळे गाजले, काही वर्षापूर्वी विद्युत विभागात घोटाळा झाला. हे प्रकरण उघडकीस आले. समिती नेमून चौकशी झाली. या मध्ये कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई झाली. तर दुर्दैवाने वरिष्ठ अभियंता तणावग्रस्त होऊन मृत्यूमुखी पडला. या शिवाय काही कारभारी नगरसेवक, अधिकारी आणि बांधकाम व्यावसाईक यांच्या संगनमताने झालेल्या टी. डी. आर. घोटाळ्याने अनेक सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाल्या. घरफाळा घोटाळ्यात अधिकाऱ्यानी महापालीकेचे कोट्यावधीचे नुकसान करून आपले लाखांचे हप्ते सुरु ठेवल्याचे प्रकरण बाहेर आले. यामध्ये काही वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना अटक झाली, निलंबन झाले.
आताही या घोटाळ्यात थेट नावे पुढे आली आहेत. या प्रकरणात दबाव तंत्राचा वापर झाला आहे. प्रकरण दाबण्यासाठी पुन्हा तो प्रयोग होण्याची शक्यता असल्याने याची योग्य चौकशी, कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
