लक्ष्मी मुक्ती योजना विनामूल्य तात्काळ अंमलबजावणी, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा: मंडल निरीक्षक सीमा मोरये
शिरोली : महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजने पाठोपाठ लक्ष्मी मुक्ती योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी विनामूल्य तात्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेतून पतीच्या सात बारा वरती पत्नीची सहहिस्सेदार म्हणून विनामूल्य नाव नोंदणी होणार आहे.तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त खातेदार शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन शिरोलीच्या मंडल निरीक्षक सीमा मोरये यांनी केले. अध्यक्षस्थानी पंचगंगा पाणी पुरवठा अध्यक्ष राजेश पाटील होते.
या वेळी शिरोलीचे ग्राम महसूल अधिकारी महेश सूर्यवंशी यांनी तात्काळ नाव नोंदणी करून सातबारा शेतकऱ्यांना ताब्यात दिल्याबद्दल त्यांचा सत्कार महाडिक हायस्कूलचे अध्यक्ष प्रकाश कौदाडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी या सातबाराचे वितरण मंडल निरीक्षक सीमा मोरये यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक नागाव महसूल अधिकारी श्रद्धा अंबपकर यांनी केले. स्वागत माजी उपसरपंच उदयसिंह पाटील यांनी केले. आभार माजी अध्यक्ष तंटामुक्त समिती राजू पाटील यांनी केले. नियोजन महसूल सेवक संदीप पुजारी दादाभाई देसाई यांनी केले. यावेळी नवजीवन सोसायटी संचालक अभिजीत पाटील, ग्रा. पं. सदस्य दीपक यादव, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
