कोल्हापूरात वंध्यत्वविषयक दोनदिवसीय शास्त्रीय परिषद
कोल्हापूर – वंध्यत्व हा एक गंभीर आणि वाढता आरोग्यविषयक प्रश्न असून, यावर योग्य निदान व उपचाराची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन, महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूर ऑब्स्टेट्रिक्स अॅण्ड गायनेकॉलॉजी सोसायटी (केओजीएस) यांच्या सहभागाने १२ व १३ जुलै २०२५ रोजी वंध्यत्वविषयक दोनदिवसीय शास्त्रीय परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. पद्मारेखा जिरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्या म्हणाल्या, या परिषदेमध्ये स्त्री व पुरुष वंध्यत्व, हार्मोनल असंतुलन, आधुनिक उपचारपद्धती (IVF, IUI), जनुकीय चाचण्या आणि नवीनतम तंत्रज्ञान यांसारख्या वंध्यत्वाच्या सर्व पैलूंवर सखोल चर्चा होणार आहे.
राज्यभरातील आणि देशपातळीवरील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, एम्ब्रॉयालॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि या क्षेत्रातील अग्रणी संशोधक मार्गदर्शन करणार आहेत. नवोदित डॉक्टर व वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ही परिषद एक मौल्यवान शैक्षणिक संधी ठरणार आहे. महाराष्ट्र ISAR शाखेच्या अध्यक्षा डॉ. पद्मा रेखा जिरगे व केओजीएसचे अध्यक्ष डॉ. मनीषी नागवकर यांनी सांगितले की, या परिषदेमुळे कोल्हापूरमधील स्त्रीरोग तज्ज्ञांना जागतिक दर्जाचे ज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
परिषदेत KOGS चा सक्रिय सहभाग असून, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्त्रीरोगतज्ज्ञांमध्ये या विषयाबाबत एकसंध जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिषदेमध्ये डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. अमित पतकी, डॉ. केदार गणला सचिव, एमएसआर, डॉ. तानाजी पाटील सहआयोजक सचिव, केओजीएस, तसेच डॉ. रणजित किल्लेदार सचिव, केओजीएस , डॉ. साधना पटवर्धन, डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. सतीश पतकी, डॉ. मिलिंद पिशवीकर, डॉ. प्रवीण हेंद्रे सहभागी होणार आहेत.
हॉटेल सयाजीमध्ये आयोजित या परिषदेचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. किरण कुर्तकोटी उपस्थित राहणार आहेत.
