शिरोलीच्या उपसरपंचपदी विजय जाधव यांची बिनविरोध निवड
शिरोली : शिरोली पुलाची गावच्या उपसरपंचपदी महाडिक गटाचे विजय जाधव यांची बिनविरोध निवड झाली. लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची निवड सभा झाली.
शिरोली ग्रामपंचायतीमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक, आ. अमल महाडिक व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपद व १७ पैकी १६ सदस्यांसह महाडिक आघाडी सत्तेवर आहे. सरपंचपद लोकनियुक्त आहे. तर उपसरपंचपदाची निवड सदस्यांतून होते. इतराना संधी देण्यासाठी रोटेशन पद्धतीत दरवर्षी उपसरपंच बदलण्याचे धोरण नेत्यानी अवलंबले असून त्यानुसार अविनाश कोळी त्यानंतर बाजीराव पाटील यानां संधी देण्यात आली. बाजीराव पाटील यानी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी घेण्यात आलेल्या सदस्यांच्या सभेत निवड प्रक्रिया पार पडली. महाडिक आघाडीचे एकनिष्ठ ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव यांच्यावर नेत्यांनी विश्वास दाखवून उपसरपंच पदासाठी त्यांचे नाव निश्चित केले.
त्यानुसार उपसरपंच पदासाठी विजय जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच करपे यांनी केली. प्रशासकीय कामकाज ग्रामविकास अधिकारी गीता कोळी यांनी पाहिले.
यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, डॉ. सुभाष पाटील, सलीम महात, राजेश पाटील, महंमद महात, बाजीराव पाटील यांची भाषणे झाली. ग्रामपंचायत सदस्या कमल कौंदाडे, सुजाता पाटील, मनीषा संकपाळ, हर्षदा यादव, कोमल समुद्रे, वसिफा पटेल, अविनाश कोळी, श्रीकांत कांबळे, महादेव सुतार, आरिफ सर्जेखान, नजीया देसाई, प्रकाश कौंदाडे, योगेश खवरे, बाळासाहेब पाटील, संदीप तानवडे, सचिन गायकवाड उपस्थित होते.
