शिरोलीत सुरू झाला भव्य शिवजयंतीसह यात्रा-उरूसाचा लोकोत्सव
शिरोली : शिरोली पुलाची गावचा परंपरेप्रमाणे ग्रामदैवत श्री काशिलिंग बिरदेव यात्रा तसेच पीर अहमदसो आणि पीर बालेचांदसो उरूस आणि भव्य प्रमाणात शिवजयंतीचा लोकोत्सव २८ एप्रिल ते ५ मे पर्यंत आयोजित केला असून शिवजयंतीच्या ३ भव्य आकर्षक मिरवणुकीने या लोकोत्सवाचा सुरुवात झाली आहे. माजी आ. महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली ग्रामपंचायतच्या पुढाकाराने यात्रा कमिटीच्यावतीने यात्रा आणि उरुसाच्या निमित्ताने बिरदेव मंदिर आणि पीर दर्गा येथे मानकरी घराण्यामार्फत परंपरेप्रमाणे धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. यात्रा उत्सव काळात करमणूक आणि विविध स्पर्धा ही आयोजित केल्या आहेत. अशी माहिती सरपंच पद्मजा कृष्णात करपे आणि उपसरपंच बाजीराव पाटील यांनी दिली.
सन २०२५ च्या शिवजयंतीचे मुख्य आकर्षण शिरोली फाटा येथे नव्याने बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमानीचा २६ एप्रिल रोजीचा अतिशय आकर्षक असा उद्घाटन समारंभ ठरला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते झालेल्या स्वागत कमानीच्या उद्घाटन सोहळ्यांने शिरोलीचे सर्व आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यांच्यासह देणगीदार आणि तमाम सर्वपक्षीय, सर्व धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली. सजवलेली कमान, आकर्षक विद्युत रोषणाई, रांगोळीची सजावट, पुष्पवृष्टी, भंडाऱ्याची उधळण उपस्थितांनी आणि परिधान केलेले भगवे फेटे, पारंपारिक वाद्य यामुळे हा ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमानी’ चा उद्घाटन सोहळा पंचक्रोशीत लक्षवेधी ठरला.
शिवजयंतीच्या निमित्ताने २८ एप्रिल रोजी संयुक्त गावभाग यांच्यावतीने शिरोली फाटा ते ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशा निघालेल्या भव्य मिरवणुकीत अफजलखान वधाचा पोवाडा आणि त्याबरोबर जिवंत देखावा यामुळे गावातील वातावरण उत्स्फूर्त आणि उत्साहपूर्ण बनले. २९ एप्रिल रोजी संयुक्त माळवाडी यांच्या तर्फे छत्रपती शिवरायांची भव्य आणि आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये संपूर्ण तरुणाईचा उत्साह प्रचंड होता. ३० एप्रिल रोजी संयुक्त शिवाजीनगर यांच्या वतीने यादववाडी, व्यंकटेश्वरनगर, छत्रपती शिवाजीनगर भागात पारंपारिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये धनगरी ढोल, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब आणि मावळ्यांच्या वेशात घोडेस्वार अशा मिरवणुकीत पालखी पुष्पवृष्टी करीत मिरवणूक काढण्यात आली.
शिरोली गावच्या हद्दीत वेशीवर असलेल्या पंचगंगा नदी काठावरील कड्याचा पीर म्हणजे पीर अहमदसो आणि नदीच्या पुलाजवळ असलेला पीर बाले चांदसो यांना उरुसानिमित्त गंध, गलफ करण्यात येते. ग्रामपंचायत आणि गाव कामगार पोलीस पाटील यांच्या वतीने केली कित्येक वर्षी नॅशनल युवा संघटनेने गंध गलफ करण्याची जबाबदारी जबाबदारी पार पाडली आहे. यावर्षी ३० एप्रिल रोजी दोन्ही पीरांना गंध गलफ करण्यात येणार आहे. तर उरूसाचा मुख्य दिवस म्हणून गुरुवार दिनांक १ मे रोजी पीर बालेचांदसो दर्ग्यात सर्व ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य नारळ देण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून उरुसाबरोबरच गावात बिरदेवाची यात्रा भरवण्याची प्रथा सुरू केली आहे. या निमित्ताने ग्रामदैवत बिरदेव मंदिरात पालखी, अभिषेक, पेहराव, जळयात्रा आणि नैवेद्य-नारळ असे धार्मिक विधी म्हणून होतात. यावर्षी रविवार दिनांक ३ मे रोजी बिरदेव यात्रा होणार आहे. या दिवशी भव्य आतिषबाजी नवभारत क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावर केली जाणार आहे. यात्रा आणि उरुसाच्या निमित्ताने छावा क्रिडा मंडळाच्या समोरील आठवडा बाजाराच्या जागेत अम्यूजमेंट पार्कसह विविध खेळांचे स्टॉल्स तसेच खेळणी,साहित्य, खाद्यपदार्थांचे स्टॉल गजबजले आहेत. या ठिकाणी मुख्य जत्रा भरण्यात येते. ती आता बुधवारपासूनच सुरू झाली आहे.
गुरुवारी रात्री करमणुकीसाठी नवभारत क्रीडा मंडळाच्या मैदानावर सुतार बंधू यांचा झंकार ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शुक्रवार दिनांक 2 मे रोजी असलेल्या दसरा मैदानात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार अमल महाडिक यांच्या सहकार्याने भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. यावेळी दिग्गज आणि नामवंत पैलवान तसेच पंचक्रोशीतील ४० च्या वर पैलवानांच्या चटकदार कुस्त्या होणार आहेत. या दिवशी रात्री ८ वाजता बहारदार कव्वालीचा कार्यक्रम होणार असून यामध्ये कव्वालीची जुगलबंदी ऐकायला मिळणार आहे. तर सोमवार दिनांक ५ मे रोजी नवभारत मैदानावर लावणी सम्राज्ञी राधा पाटील मुंबईकर यांच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याबरोबरच मोटरसायकल बरोबर म्हैस पळवणे. रेडकू पळवणे तसेच बैलगाडी शर्यतीचेही आयोजन केले आहे . बैलगाडी शर्यती सोमवार दिनांक ५ मे रोजी सकाळी वीटभट्टी माळावर होणार आहेत. एकूण ६ प्रकारच्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरोली गावातील यात्रा, उरूस आणि शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहात धर्म आणि परंपरेप्रमाणे तसेच शांततेत पार पाडावा यासाठी विद्यमान सरपंच पद्मजा कृष्णात करपे, उपसरपंच बाजीराव पाटील यांच्याबरोबरच ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी, सुजाता पाटील, महादेव सुतार, विजय जाधव, श्रीकांत कांबळे, महंमद महात, कमल कौंदाडे वस्तीबा पटेल, कोमल समुद्रे, हर्षदा यादव, आरिफ सर्जेखान, अनिता शिंदे, नाजिया देसाई, धनश्री खवरे, शक्ती यादव, ग्रामविकास अधिकारी गीता कोळी यांच्याबरोबरच माजी उपसरपंच कृष्णात करपे, प्रकाश कौंदाडे, योगेश खवरे, बाळासो पाटील आदी विशेष परिश्रम घेत आहेत.
