श्रीक्षेत्र जोतिबा यात्रा; भाविकांची भक्ती, उत्साह, धार्मिक विधी, मंत्र्यांचे साकडे
कोल्हापूर : जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर गुलाल खोबऱ्याची उधळण, ढोल आणि हालगीच्या तालावर नाचवल्या जाणाऱ्या सासनकाठ्या घेऊन आखंड महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाचे कुलदैवत श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र पौर्णीमा यात्रा मोठ्या भक्तीपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडली. नवसाला पावणारा देव म्हणून जोतिबा प्रसिद्ध आहे. त्यामुळं कोण नवस फेडायला तर कोण नव्यानं साकडं घालायला जोतिबा डोंगरावर येतो. श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या १०८ सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या होत्या. चांगभलंच्या गजराने अवघा डोंगर दुमदुमून गेला. डोंगरवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या तसेच एस टी, ट्रक, टेम्पो, मोटर गाड्या, दुचाकी वहाने, बैलगाडी, खासगी वाहने, आणि चालत भाविक गेल्या तीन दिवसापासून डोंगरावर दाखल झाले होते. जोतिबा मंदिरात पहाटे धार्मिक विधीनंतर सोहळ्यास प्रारंभ झाला. सकाळी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक संपन्न झाला. दुपारी बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर सासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान पाडळी जि. सातारा या सासनकाठीचा असतो. त्यानंतर मौजे विहे ता. पाटण, नंतर करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज ता. मिरज, कसबा सांगाव ता. कागल, किवळ जि. सातारा, कवठेएकंद जि. सांगली यांच्यासह मानाच्या एकूण १०८ सासनकाठ्या सहभागी झाल्या.
जिल्ह्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत यासाठी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह वेगवान प्रगतीसाठी दख्खनचा राजा श्री जोतिबाकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साकडे घातले. राज्यातील सर्व नागरीकांना आरोग्यसंपन्न, सुखी व आनंदी राहू दे अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यांच्या हस्ते चैत्र पौर्णिमा जोतिबा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जोतिबा देवाच्या भेटीसाठी आलेल्या भाविकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती. गुलालाने न्हाउन निघालेल्या लाखो भाविकांनी दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगर गुलाबी रंगात अगदी फुलून गेला होता. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, महादेव दिंडे, धैर्यशील तिवले उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी मंदिरात जोतिबा देवाचे दर्शन घेतले.
यावर्षी प्लास्टिकमुक्त यात्रा पार पाडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे २५ हजारावर कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. परिसरातील सर्व दुकानदारांना प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच डोंगरावर ३० ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर लावण्यात आले. अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी, पार्किंगची ३४ ठिकाणी व्यवस्था, विविध ठिकाणी अन्नछत्र, चहा, नाष्टा प्रसाद महाप्रसाद सरबत वाटप करण्यात येत होते. गायमुखाजवळ सहज सेवा ट्रस्टच्यावतीने सलग तीन दिवस महाप्रसाद, चहा, नाष्टा, ताक, आणि आरोग्य प्रथमोपचार, तपासाणी, औषधे पुरवण्यात आली. टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनच्या वतीने यात्रा मार्गावर बिघडलेल्या, पंक्चर झालेल्या मोटर सायकल मोफत दुरुस्तीची सेवा देण्यात येत होती. दर्शन रांग व्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटिव्ही, पोलीस बंदोबस्त, पाण्याची सोय, आरोग्य सुविधा, स्वच्छता, लाईव्ह दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी सनियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
