उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यात कॉ. गिरीश फोंडेनी उडवली पोलीसांची झोप
कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉ. गिरीश फोंडे यानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्ताने आक्रमक भुमिका घेतली यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. याबरोबरच त्यांना अटक करून स्थानबद्ध करण्यासाठी पोलिसानी केलेले प्रयत्न मात्र अयशस्वी ठरले. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा पूर्ण होईपर्यंत पोलीसांची मात्र तारांबळ उडाली.
कॉ. गिरीश फोंडे यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूकी पूर्वी दिलेले अश्वासन पाळले नाही याबाबत शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या आंदोलनात आक्रमक भुमिका घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शनिवार दि. ५ एप्रिल रोजीच्या कोल्हापूर दौऱ्यात कुणाल कामरा यांचे गाणे लावून निषेध करण्याची घोषणा केली. यांची सरकारच्यावतीने गंभीर दखल घेतली.
फोंडे हे कोल्हापूर महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करीत आहेत तरीही त्यांनी सरकार विरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवून त्यांचेवर निलंबनाची कारवाई केली. याबरोबरच कृती समितीच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर कारवाई म्हणून अटकसत्र सुरू केले. यापैकी काहिजणांना ताब्यातही घेतले.
कॉ. फोंडे यांचे पुलाची शिरोली गावात वास्तव्य आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले पण ते मिळून आले नाहीत. पोलीसांनी रात्रभर अक्षरशः पहाटेपर्यंत त्यांच्या घरी चकरा मारल्या. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते मिळून आले नाहीत आणि संपर्कही होऊ शकला नाही त्यामुळे पोलीस हतबल झाले. उपमुख्यमंत्र्यांच्या आगमनाची वेळ जवळ येऊ लागल्याने पोलीसांचे टेन्शन वाढू लागले. शिरोली एमआयडिसी पोलीस ठाण्याचे स. पो. नि. सुनिल गायकवाड हे फोंडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मोबाईल फोनवर संपर्क झाला. आणि फोंडे यांनी आपण मुंबईत असून निलंबनाच्या कारवाई विरोधात दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात आल्याचे सांगितले. स. पो. नि. गायकवाड यांनी त्यांना लोकेशन पाठवण्यास सांगितले असता फोंडे यांनी स्पष्ट नकार दिला आणि फोन बंद केला. त्यामुळे फोंडे यांनी कोल्हापुरात राहून गनिमी काव्याने काही करू नये यासाठी ते मुंबईतच असल्याची खात्री करून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागले. यासाठी मुंबई पोलीसांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. तसेच लागलेल्या मोबाईल फोनचे लोकेशनही तपासून तो फोन मुंबईतच असल्याची खात्री करून घेतली. लागलेला फोन, त्यावर स्वतः फोंडेशी झालेले बोलणे आणि फोनचे लोकेशन यामुळे फोंडेही मुंबईतच असल्याची खात्री झाली. आणि पोलीसांना दिलासा मिळाला. तरीही शिवसेना ऊबाठा गटाचे नेते विजय देवणे यांनी मात्र काही कार्यकत्यांसह गनिमी काव्याने जिल्ह्यात आंदोलन केलेच.
