November 1, 2025

शिरोलीत कृषी पंपांच्या साहित्यांची वारंवार चोरी : संस्था, शेतकरी हतबल

0
GridArt_20250203_185532874

शिरोली : शिरोली पुलाची येथील कृषी पाणी पुरवठा संस्थेच्या कृषी पंपांच्या मोटरच्या केबल, कॉन्ट्रॅक्ट पट्ट्या आदी तांब्याच्या साहित्यांच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी हे साहित्य चोरट्याने चोरून नेऊन धुमाकूळ घातला आहे. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीसांकडून फिर्याद घेण्यास आणि तपासाबाबत होणाऱ्या दिरंगाईमुळे कृषी सह. संस्थांचे आर्थिक नुकसान होत असून शेतकऱ्यानां पाणी पुरवठा करण्यासही अडचणी येत असल्याने पीकांचेही नुकसान होत आहे.
शिरोलीतील शिरोली विकास संस्थेच्या पेटीचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दोन वेळा चोरी केली आहे. यामुळे संस्थेचे ५० हजाराचे वर नुकसान झाले आहे याबाबत संस्थेच्या वतीने चोरीची फिर्याद देण्यासाठी संस्थेचा कर्मचारी शिरोली पोलीस ठाण्यात गेला असता पोलीसानी टाळाटाळ केली. त्यानंतर चेअरमन सतीश पाटील यांनी प्रयत्न केल्यानंतर चोरीची फिर्याद घेतली पण तपास झाला नाही. त्यामुळे चोरट्याने दुसऱ्यांदा त्याच संस्थेच्या इलेक्ट्रिक साहित्याची परत चोरी केली.
पंचगंगा नदीवरील या ठिकाणी वारंवार केबल चोरीची व कॉपर पट्ट्यांच्या चोरीचे घटना वारंवार घडत आहेत. या ठिकाणी चोरटे बिनधास्तपणे चोरी करून शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. याच प्रकारे पांडुरंग पाणीपुरवठा संस्थेच्या केबलच्या तारा चोरून नेल्या होत्या तसेच या संस्थेच्या केबलही चोरट्याने चोरून नेल्या. या संस्थेनेही चोरीची फिर्याद शिरोली पोलीस ठाण्यात दिली तरीही पुन्हा 50 फूट लांबीची केबल चोरट्याने तोडून चोरून नेली.
यापूर्वी याच ठिकाणाहून वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मरचा विद्युत पुरवठा बंद करून ट्रान्सफार्मर खाली उतरून त्यातले ऑइल काढून सुमारे दीड लाख रुपयाची कॉपर वायर चोरून नेण्याचा प्रकार घडला. याबाबत फिर्याद वीज वितरण कंपनीनेही पोलीस ठाण्यात दिली होती पण त्याचा अद्याप तपास झाला नसल्याचे समजते.
सध्या तुटलेल्या खोडवा ऊसात आणि नवीन लागणीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे चार दिवस रात्र पाळी चार दिवस दिवस पाळी अशामुळे शेतकरी कसातरी पाण्याचा मेळ घालत आहे. पुराच्या पाण्यामुळे मागील वर्षी येथील ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणातील नुकसान, परत केबल चोरीचे प्रकार घडल्यामुळे पाण्याच्या पुढील पाळीचे नियोजन चुकत आहे.
संस्थांना चोरलेल्या इलेक्ट्रिक साहित्याची खरेदी व परत पाण्याचे पाळीमध्ये बदल यामुळे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. यामध्ये शेतकरी मात्र दुहेरी संकटात सापडला आहे
वारंवार होणाऱ्या या केबल चोरीच्या प्रकारामुळे शेतकरी आणि कृषी पाणी पुरवठा संस्था हतबल झाल्या आहेत. तसेच संताप ही व्यक्त होत आहे तरी पोलिसांनी या चोरट्यांचा त्वरित शोध घ्यावा, झालेल्या चोऱ्यांचा तपास करावा आणि पोलिसानी गस्त वाढवून चोरीच्या प्रकाराला आळा घालावा अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page