हिंदुत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, काशी मथुराही मुक्त होईल :आ. राजासिंह ठाकूर
शिरोली पुलाची : ‘अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा उत्सव आपण साजरा केला आहे. आता २०२९ पर्यंत काशी मथुराही मुक्त होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशाळगडही मुक्त करावा. असे प्रतिपादन हैद्राबाद येथील आमदार राजासिंह ठाकूर यांनी व्यक्त करताना विकासबरोबरच हिंदुत्वाची भाषा करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहनही केले. ते येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर शक्ती जागर मंच व सकल हिंदू समाज कोल्हापूर जिल्हा यांच्यातर्फे आयोजित हिंदू धर्मसभेत ते बोलत होते. यावेळी कणेरी मठाचे श्री चिदानंद स्वामी, भाजप महिला जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम, संताजी घोरपडे, विशाल जाधव, शिरोलीच्या सरपंच पद्मजा करपे व्यासपीठावर उपस्थित होते.
शिरोली पुलाची येथील शक्ती जागर मंच, सर्व हिंदू महामेळावा कमीटीचे प्रमुख निलेश शिंदे, योगेश खाडे, श्रीकांत कदम, विशाल खोचिकर, रोहन तानवडे, गणेश खोचिकर, अनिकेत पाटील, प्रथमेश खाडे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी आ.ठाकूर म्हणाले, ‘यापूर्वीचे हिंदूंवरील अत्याचार आपण फक्त ऐकले होते. परंतु, बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार आपण पाहत आहोत. पाकिस्तान व बांगलादेशमधील हिंदू सुरक्षित नाहीत. केंद्र सरकारने सर्वांनाच लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करणे गरजेचे आहे. ४६० वर्ष संघर्ष केल्यानंतर सन १९९२ साली बाबरी मस्जिद पाडली आणि त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर बांधून दाखवले. आता काशी आणि मथुरेत ही मंदिरे उभारली जाणार आहेत. मुस्लिमांनी मंदिर तोडून मस्जिद बनवली. जेवढे मंदिर तोडली आहेत तेवढी नवीन बांधली जाणार आहेत.
प्रत्येक हिंदूने आपल्या मुलांना इंजिनिअर, डॉक्टर बनवा त्यात काही गैर नाही; पण आपल्या मुलांना हिंदू संस्कृती पण शिकवा. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. नाममात्र हिंदू पाकिस्तान, बांगलादेशमध्ये वाचले आहेत. पुढच्या पंधरा ते वीस वर्षांनंतर भारतातही असेच होऊ शकते म्हणून हिंदूंनो आताच जागे व्हा. शासनाने वफ्क बोर्ड जमीन काढून घेऊन कॉलेज, रुग्णालय उभी करावीत, असे आवाहनही त्यानी केले.
यावेळी माजी सरपंच शशिकांत खवरे, माजी उपसरपंच कृष्णात करपे, महेश चव्हाण, सुरेश यादव, राजेश पाटील, माजी उपसरपंच सुरेश यादव, उपसरपंच बाजीराव पाटील, प्रकाश कौंदाडे, विजय जाधव, बाळासाहेब पाटील, सुजाता पाटील, अर्जुन चौगुले, नितीन चव्हाण, सतीश रेडेकर, राजेंद्र सुतार आदी उपस्थित होते.
