सोनू निगमच्या नववर्षाची सुरुवात मराठमोळ्या गाण्याने
मुंबई : सोनू निगमने आपल्या गाण्याने देशातील प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नवीन वर्षाची सुरुवात सोनू निगमने एका मराठमोळ्या गाण्याने केली आहे. होय सुबोध भावे दिग्दर्शित आणि शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं, आगामी मराठी चित्रपट ‘संगीत मानापमान‘ यातलं गाणं ‘चंद्रिका’ सोनू निगम ह्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने गायलं आहे जे नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.
गायक सोनू निगमने पहिल्यांदाच अशा प्रकारचं गाणं एका मराठी सिनेमासाठी गायलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. “चंद्रिका” सारखं गाणं मी कदाचित आतापर्यंत कोणत्याही चित्रपटासाठी गायलं नसेल, हे गाणं खूपच वेगळं आहे, हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा एका मंदिराचे वातावरण तयार झाले, परंतु हे एक डिव्होशनला सोंग नसून प्रेमाचं गीत आहे. प्रेमा मध्ये सुद्धा भक्ती आहे, मी ह्या गाण्यासाठी कुठला हि स्वार्थ ना करता स्वतःला पूर्णपणे समर्पण केलं आहे. सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी ह्या दोघा कलाकारांवर हे गाणं चित्रीत केलं गेलय.
सोनू निगम नाट्य संगीतबद्दल बोलताना म्हणाला ‘मी संगीताच्या शैलीशी संबंधित आहे, म्हणूनच मी जगात शक्य तितके संगीत शिकण्याचा प्रयत्न करतो, मला माझ्या लहानपणी शास्त्रीय संगीत शिकता आले नाही. त्यामुळे जितकं होईल तितकं शिकून मी प्रेक्षकांसाठी गातो. स्वर्गीय लता मंगेशकर जी आणि आशा जी हे महान गीतकार आहेत तर अजय-अतुल हे सुद्धा उत्तम संगीतकार आहेत, त्या सर्वांना नाट्यसंगीताची खूप खोलवर माहित आहे. त्यामुळे त्यांच्याकाढून शिकण्यासारखं खूप काही आहे.’
इतकच नव्हे तर मराठी संगीत आणि मराठी गायक या विषयी सुद्धा सोनू निगम ह्यांनी आपला मत मांडताना “मराठी गाण्यांमध्ये खूप शोध आहे, जो कोणी संगीतकार किंवा गायक सुराला शोधून काढतो फक्त तोच एक लेजेंड बनू शकतो. मराठी संगीत तर आहेच पण त्याबरोबर मराठी लेखन हे ही एक वेगळं विश्व आहे. मराठीतील बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर हे सगळे उत्तम गायक आहेत. पण तरुणांमध्ये मला आर्या आंबेकरचा आवाज खूप आवडतो, तिने चंद्रमुखी मध्ये खूप सुरेख गायलं आहे.
या वेळी सोनू निगम ह्यांनी “संगीत मानापमान” या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता सुबोध भावे, जिओ स्टुडिओज हे मराठीसाठी नेहमीच काहीतरी नवीन कन्टेन्ट प्रेक्षकांसमोर आणण्याच्या प्रयत्नात असतात.
सुंदर आवाज, सुंदर कंपोझिशन, सुंदर चित्रीकरण असल्यामुळे रसिक प्रेक्षकांकडून ह्या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ या चित्रपटात सूबोध भावे आणि वैदेही परशुरामी सोबत सुमित राघवन, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ‘संगीत मानापमान’ हा संगीतमय चित्रपट १० जानेवारी २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
