मंगळवारी सर्व पक्ष, संघटनांची शिरोली बंदची हाक
शिरोली : परभणीतील संविधान अवमान, केंद्रीय मंत्री अमित शाहांचे वादग्रस्त वक्तव्य, बीड जिल्हयातील मस्साजोग सरपंच हत्या या सर्व घटनांच्या निषेधार्थ मंगळवारी पुलाची शिरोली गाव बंद ची घोषणा विविध संघटनांनी केली आहे.
परभणी येथील संविधान प्रतिकृतीची मोडतोड, आंदोलनातील कार्यकर्त्यांना मारहाण, अटक केलेल्या कार्यकर्त्याचा झालेला संशयास्पद मृत्यू , केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वक्तव्य. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा झालेली हत्या. या सर्व घटनांच्या निषेधार्थ मंगळवारी पुलाची शिरोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय विविध समाज व संघटनांनी घेतला आहे. याबाबत शिरोलीचे माजी ग्रां. पं. सदस्य बाबासो कांबळे, तसेच रणजीत केळूसकर, सुजित समुद्रे य यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन विविध समाज व संघटनांच्यावतीने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स. पो. नि.सुनिल गायकवाड यांना दिले. यावेळी ग्रां. पं. सदस्य श्रीकांत कांबळे, अन्सार देसाई आदी उपस्थित होते.
हा बंद शिरोली गावासह परिसरातील लोकांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून शांततेने यशस्वी करावा, असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
