मुख्यमंत्री शिंदेचा ‘मुंबई ते दरे व्हाया दिल्ली’ राजकीय दौरा आणि नाराजीनाट्य
कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या अडीच वर्षात खरे राजकीय हिरो ठरले. त्यांनी मूळ शिवसेना फोडली. ४० आमदार घेऊन गेले आणि मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले. ‘गद्दार’ हा कपाळावरील ठळक शिक्का पुसण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. शिवसेनेचा विचार, हिंदुत्व याचा वापर केला. शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून धडाधड निर्णय घेतले. तरीही लोकसभेच्या निवडणुकीत आलेले अपयश आणि त्यानंतर ‘लाडकी बहीण’ योजनेचा हुकमी एका चांगलाच चालला. अर्थातच या योजनेचे मुख्य प्रवर्तक एकनाथ शिंदेच राहिले. एकनाथ शिंदे यांनी भाजपला इतके सर्व मिळवून दिल्यानंतर पुन्हा त्यांना राजकीय वर्चस्वासाठी झगडावे लागत आहे.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी खऱ्या अर्थाने महायुतीचे नेतृत्व केले. तुलनेने भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार दोन पावले मागेच राहिले. निकालात मात्र महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपने आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली. संख्याबळावर मुख्यमंत्री पदाचा दावा केला. त्यामध्ये गैर असे काहीच नाही. महायुतीचा निर्णय दिल्लीवर मोदी, शाहंवर सोपवला. त्यामुळे घटक पक्षाचे नेते म्हणून शिंदे, अजित पवारांना दिल्ली दरबारी हजेरी लावावी लागली. त्यांनी आपल्या मागण्या पुढे केल्या पण यामध्ये चर्चा किती झाली आणि काय झाली? हे मात्र गुलदस्त्यातच राहिले. आणि या गुलदस्त्यातून नाराजीची विखुरलेली फुले दिल्ली, मुंबई आणि मुख्यमंत्री यांच्या दरे गावापर्यंत विखुरली गेल्याचे दिसले.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे नाव मागे पडून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आले तसेच शिंदे यांच्या चेहऱ्यावरील नाराजी प्रकट होऊ लागली. महायुतीकडून सरकार स्थापनेसह नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी लांबणीवर पडू लागला आहे. मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या महायुतीतील तिन्ही पक्षातील आमदारांचा जीव टांगणीला लागला आहे. शिंदेंची नाराजी वाढत गेली आहे. त्याचा कळस गाठला दिल्लीतील अमित शहा यांच्याबरोबरच्या बैठकीत. तेथून ते तडक मुंबईत आले. महायुतीची बैठक आधीच ठरली होती. ती रद्द झाली. काही राजकिय नेते त्यांना भेटले. मुंबई ते दिल्ली प्रवासादरम्यान त्यांनी अनेक वेळा मी नाराज नाही असे वारंवार सांगितले. पण त्यांचा चेहरा आणि देहबोलीतून नाराजी स्पष्ट दिसत होती.
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतूनही त्यांना चिडवण्याचे काम सुरू झाले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत पासून शरद पवार नाना पटोले यांच्यापर्यंत सर्वांनी भाजप मुख्यमंत्री पद कसे सोडणार? लाडका भाऊ काय करणार? असे हिणवण्यास सुरुवात केली. पक्ष फोडून, गद्दारी करून, ४० आमदार पळवून नेऊन, भाजपच्या हातात सत्ता देऊन, अडीच वर्षे मुख्यमंत्री निर्णय घेऊन, विधानसभेच्या निवडणुकीत नेतृत्व करून पुन्हा मोठे यश मिळवून देऊनही आता भाजप सर्वकाही शिंदेंकडून आपल्या हातात घेऊ पाहत आहे. भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे. म्हणजे आता उपमुख्यमंत्री पद आणि काही महत्त्वाच्या खात्याची मंत्रीपदे याशिवाय पदरात काही पडणार नाही. याची खात्री शिंदे यांना झाली आहे.
अमित शहा यांच्याबरोबरच्या चर्चेत नेमकं काय मिळणार याची चर्चा झालीच असेल आणि त्यापेक्षा ज्यादा काही मिळेल अशी शक्यताही नसल्याने वारंवार मी नाराज नाही असे सांगणाऱ्या शिंदेंना आपली नाराजी प्रकट करावीच लागली आहे. कारण हा फक्त एकनाथ शिंदे यांच्या एकट्यापुरता प्रश्न नाही. त्यांच्या भरोश्यावर पक्ष सोडून, राजकीय भवितव्य पणाला लावून आलेल्या शिवसेनेच्या आमदार, खासदार यांच्याही भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच त्यांनी आता उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी महायुतीची ठरलेली बैठक रद्द केली. तातडीने आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी रवाना झाले. तसेच राज्याचा काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार असूनही त्यांना आता स्वतःची आणि शिवसेना पक्षाची काळजी वाहण्याची पाळी आली आहे. म्हणूनच राज्याचा कारभार पाहण्याचे सोडून ते आपल्या ‘दरे’ गावात शेतातील मातीत जाऊन बसले आहेत. आता त्यांची तब्येती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधक मात्र त्यांचा हा ‘राजकीय आजार’ असल्याचे सांगून त्यांना आणखी डिवचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मोठ्या प्रमाणात बहुमत असूनही महायुतीला सत्ता स्थापन करण्यात वेळ लागत असल्याने त्यावर टीका करण्याची संधी महाविकास आघाडीचे नेते खा. संजय राऊत, शरद पवार यांच्या सर्वच नेते घेत आहेत. संख्याबळावर भाजपला सत्ता स्थापन करणे अवघड नाही. राष्ट्रवादीचे अजित पवारही आपली बाजू स्पष्ट करून निवांत राहिले आहेत. तरीही एकनाथ शिंदेंशिवाय सरकार स्थापन करण्याची घाई भाजप करणार नाही. म्हणूनच नव्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. तरीही एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करणे, समजूत काढणे, मनधरणी करणे यासाठी मात्र कोणाकडून प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे दिल्लीच्या नेतृत्वाकडून जे मिळेल तेच घ्यावे लागेल असाही संदेश यातून दिला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘मुंबई ते दरे व्हाया दिल्ली’ प्रवासात ‘अजूनही रुसून आहे. खुलता कळी खुलेना!’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
