योग्य निर्णय, अचूक जोडण्यांमुळे डॉ.मिणचेकरांची विजयाकडे घोडदौड
कोल्हापूर : हातकणंगले राखीव मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाकडून डॉ. सुजित मिणचेकर यांना उमेदवारी मिळाली नाही. अपक्ष लढून अपयश पदरी पडून घेणं परवडणारं नव्हतं. अशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी घेण्याच्या त्यांचा निर्णय योग्य ठरला. सत्तेत असूनही आणि नसूनही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची होणारी कोंडी या निमित्ताने आपोआप फुटली. जातीय समीकरणात दोन समाज त्यांना आपोआप जोडले गेले. व्यक्तिगत संपर्क, दोस्ताना, सर्वांशी आदराने वागण्याची पद्धत यामुळे डॉ. सुजित मिणचेकर यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता दोन्ही विरोधी उमेदवार प्रबळ असूनही आता त्यांची विजयी घोडदोड सुरू असल्याचे चित्र आहे.
गेल्या निवडणूकीत डॉ. सुजित मिणचेकर यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आपले जनसंपर्काचे काम सातत्याने सुरूच ठेवले. दरम्यान राज्यात महायुती-महाविकास आघाडीचे राजकारण सुरू झाले. आघाडीने विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्याचे धोरण निश्चित केले. शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटाने त्यांना आकर्षित केले होते. पण निष्ठेने त्यावर मात केली. ते ठाकरे गटाकडे थांबले. ठाकरे गटाचे नेते त्यांना हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेकडे घेऊ आणि तुम्हाला उमेदवारीही देऊच असे सांगत होते. तसे वरिष्ठ पातळीवर चांगले प्रयत्नही झाले. लोकसभेला इंडिया आघाडीत हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार देण्याचा निर्णय झाला त्यावेळी डॉ. सुजित मिणचेकर यांच्याही नावाचा प्रामुख्याने विचार झाला होता. पण यावेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे वजन भारी पडले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना लोकसभेत पराभवाचा चटका बसला. तरीही ‘चळवळ टिकली पाहिजे’ हे त्यांचे धोरण पुढे घेऊन जाताना परिवर्तन महाशक्तीच्या प्रयोगात ते सहभागी झाले. त्यातून त्यांनी डॉ. सुजित मिणचेकर यांना निमंत्रित केले. अपक्ष लढतीतून काही साध्य होणार नाही म्हणून थांबलेल्या डॉ. सुजित मिणचेकर यांना आयते शेतकरी संघटनेचे 30 ते 40 हजार मताचे पॅकेज चालून आले. त्यांनी राजू शेट्टी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण अंतर्गत काही अटी घातल्या. त्यामध्ये प्रचारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मोठा असेल. माझ्यासोबत कोणीही शिवसैनिक संघटनेत थेट प्रवेश करणार नाही. निवडून आल्यानंतर महायुतीकडे जाणार नाही. मातोश्रीवरच जाणार अशा या अटी असल्याचे समजते. त्यातील काहीचा प्रत्ययही आला आहे.
हातकणंगले तालुक्यात शिवसेनेचा मोठा गट आहे पण डॉ. सुजित मिणचेकर यांचा इतर राजकीय नेत्यांसारखा स्वतंत्र गट नाही. आहे त्या शिवसैनिकांना व्यवस्थित त्यांनी हाताळले आहे. गेल्या पाच वर्षात डॉ. सुजित मिणचेकर यांचा पराभव झाला. काँग्रेसचे राजूबाबा आवळे निवडून आले. अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात आणि त्यानंतर महायुतीच्या काळातही शिवसैनिकांची परवडच झाली. त्यामुळे महाविकास आघाडी असूनही शिवसैनिकांना आमदार राजूबाबा आवळेंबद्दल आस्था तर नाहीच उलट तिरस्कार निर्माण झाला. याची प्रचिती आवळे यानां शिवसेनेच्या दोन बैठकीत आली. यामुळे आता मतदारसंघातील ८० टक्केहून अधिक शिवसैनिक डॉ. सुजित मिणचेकर यांच्या बाजूने ठाम राहिला आहे. गेल्या वेळी सेना-भाजप युती होती. तरीही अंतर्गत भाजपच्या एका गटाने डॉ. मिणचेकर यांच्या विरोधात काम केले. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या एका गटानेही मिणचेकर यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले. आता हे सर्व थेट विरोधात आहेत.
राजू शेट्टी यांनी शाहूवाडी-पन्हाळ्यात लोकसभेत विरोधक म्हणून लढूनही शिवसेना ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील (आबा) यांना पाठिंबा देऊन संघटनेची मते त्यांच्या पदरात टाकली. त्याचा सकारात्मक परिणाम हातकणंगलेतील शिवसैनिकांवर झाला. शिवसेना ठाकरे गटाची आता पंचवीस हजारहून अधिक मते डॉ. सुजित मिणचेकर यांच्या बाजूने झाली आहेत.
तालुक्यातील दलित समाजापैकी हरिजन समाजानेही यावेळी 2009 सालची पुनरावृत्ती करण्यासाठी डॉ. सुजित मिणचेकर मागे ठाम राहण्याचा निर्णय केला आहे. ५५०००हून अधिक मतदार असलेल्या या समाजाची ही ३५००० पेक्षा अधिक मते डॉ. सुजित मिणचेकर यांना मिळतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. आणि त्यामध्ये स्वयंस्फूर्ती अधिक आहे.
याशिवाय डॉ. सुजित मिणचेकर यांनी आता सततचा संपर्क, व्यक्तिगत संबंध, इतर समाजाशी संधान बांधून सुरू केलेल्या बेरजेच्या राजकारणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राजू शेट्टींच्या माध्यमातून जैन समाज असेल, तसेच मराठा समाज, गुरव, नाभिक, लिंगायत समाज आधी समाजाने एकत्रित येऊन त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे सुरुवातीला महायुतीचे अशोकराव माने विरुद्ध महाविकास आघाडीचे राजूबाबा आवळे यांच्यातील सरळ लढतीला छेद देऊन तिरंगी लढतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून डॉ. सुजित मिणचेकर यांनी विजयाकडे घोडदौड सुरू केली आहे.
