दुर्गामूर्ती विसर्जन करताना माणगांंवचा युवक गेला वाहून : सहाजण बचावले
हुपरी : दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन करताना माणगाव (ता.हातकणगंले) येथील प्रकाश शिवाजी परीट (वय ३५) हा युवक वाहून गेला आहे.गेल्या दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. यामध्ये अन्य सहाजण वाचले असून ही घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान रूई बंधारा येथे घडली आहे. बोटीच्या सहाय्याने दिवसभर शोधमोहीम सुरू आहे मात्र मृतदेह अद्याप सापडला नाही या घटनेने खळबळ उडाली आहे.
माणगाव येथील गांधी चौक तरूण मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. शनिवार दि.१२ रोजी दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन करण्याकरिता रूई येथील पंचगंगा नदीवरील बंधारा नजीक मंडळाचे वीस ते तीस कार्यकर्ते गेले होते. मूर्ती घेवून आठ कार्यकर्ते नदीपात्रात गेले. यावेळी काही कार्यकर्ते नदीत कोसळले. पाण्याला प्रचंड वेग असल्याने प्रकाश परीट हा वाहून गेला. त्याचा रात्री उशीरा पर्यत मंडळाचे कार्यकर्ते तसेच सरपंच राजू मगदूम ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आज दिवसभरात हुपरी पोलिस ठाण्याचे पो. नि. गजानन सरगर, फौजदार अशोक चव्हाण, पोलिस पाटील नितीश तराळ, गोपनीय विभागाचे एकनाथ भांगरे,पोकाॅ प्रभाकर कांबळे दर्शन धुळे,यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. इंगळी ते चंदूर हद्दी पर्यंत पाहाणी केली मात्र पण तो मिळून आला नाही.पाण्याचा प्रवाहात जोर असल्याने दूर अंतरावर वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
