कोल्हापूर जिल्ह्यातही बालिकेवर अत्याचार करून खून; महाराष्ट्र पुन्हा हादरला
शिरोली : बदलापूर बालिका अत्याचार आणि खून प्रकरणाने राज्यातील वातावरण तापलेले असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शिये गावच्या हद्दीत एका परप्रांतीय कुटुंबातील १० वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून केल्याची घडली. यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. शिये गावातील श्रीरामनगर मध्ये रोजदारीसाठी बिहारमधून आलेल्या एका दांपत्याच्या बालिकेला घरातून घेऊन जाऊन जवळच्या ऊसाच्या शेतात ओढत नेले आणि पाशवी बलात्कार करून निर्घृण खून केला. या घटनेने याच परिसरत १५ वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच प्रकारे अल्पवयीन मुलीचा झालेल्या बलात्कार आणि खुनाच्या आठवणीने हा परिसर पुन्हा हेलावून गेला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काही मंत्री लाडकी बहीण योजनेच्या वितरणासाठी कोल्हापुरात आले असतानाच ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याने पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेली अधिक माहिती अशी रामनगर येथे एक कुटुंब आपली पत्नी आणि ५ मुले यांच्यासह राहतात ते रोजगारासाठी बिहार राज्यातून येथे आले आहेत. ते व त्यांची पत्नी शिरोली एमआयडीसी मधील एका कारखान्यात कामाला जातात. त्यांना तीन मुले आणि दोन मुली अशी पाच आपत्ये असून परिस्थितीमुळे शिक्षण न घेता घरीच असतात. काल बुधवारी सकाळी हे पती पत्नी कामाला गेले होते. दुपारी १२ वाजन्याच्या सुमारास त्यांचा मामा याठिकाणी आला आणि जेवण करून झोपला. तेव्हा १० वर्षाची मुलगी घरीच होती. दुपारनंतर मात्र ती दिसून आली नाही. बराच वेळ वाट पाहून तीचा आई वडील मामा आणि इतरानी शोध सुरु केला. पण ती मिळून आली नाही. रात्री उशिरा नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसार सपोनि पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रात्रभर शोध घेतला.
सकाळी श्वान पथक पाचरण करून शोध घेतला असता श्वानाने घरातील साहित्याचा वास घेऊन माग काढत जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात धाव घेतली. याठिकाणी पोलिसांनी तपास करताना मुलीचा मृतदेह मिळून आला. सपोनी पंकज गिरी यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून माहिती दिली आणि सदर घटनेचा पंचनामा केला. फॉरेन्सिक लॅबचे पथक मागवून या ठिकाणी मृतदेहाचे आणि वस्तूंचे काही नमुने घेण्यात आले. आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाशेजारी काही अंतरावर पायातील चपला पडल्या होत्या यामुळे तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. यातील प्राथमिक तपासात जवळच्या एका कारखान्याच्या सीसीटीव्ही मध्ये एक तरुण या मुलीला ऊसाच्या शेताकडे ओढत नेत असल्याचे फुटेज मिळाले आहे. यावरून एका संशयिताला आणि काही तरुणांना चौकशी साठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उप अधीक्षक सुजित क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो. नि. रविंद्र कळमकर यांनी भेट देऊन पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले.
भेदरलेली भावंडे आणि मातेचा टाहो
हे कुटुंब पत्नी, ५ मुले असे हे कुटुंब पोटासाठी महाराष्ट्रात आले आणि कोल्हापुरातील एमआयडीसीतील कारखान्यात रोजंदारी करू लागले. दररोज सकाळी घराबाहेर पडल्यानंतर दहा वर्षाखालील ही पाच भावंडे एकमेकांना आधार देत सांभाळ करीत होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा मामा या ठिकाणी राहायला आला. पण तो मुलांच्याकडे फारसे लक्ष देत नव्हता. काल अचानक गायब झालेली आपली दहा वर्षाची मुलगी परत येईल या आशेने दिवस-रात्र आई-वडिलांनी तिचा शोध घेतला. पण छिन्न-विच्छिन्न अवस्थेतील मुलीचा मृतदेह पाहून मुलीच्या आईने टाहो फोडला. तरीही इतर नातेवाईकांना हा प्रकार फोनवरून कळवण्याचेही दुर्भाग्य तिच्या नशिबी आले. हा सर्व प्रकार भेदरलेल्या अवस्थेत इतर चार भावंडे पहात होती. हे दृश्य पाहून तेथील सर्वांचेच मन गलबलून गेले.
