शिरोलीत ॲम्बुलन्स मधून पथक आले; छापा टाकून गेले
शिरोली : कोणत्याही शुभकार्याला ‘बधाई’ देण्यासाठी शिरोली फाट्यावरील मुख्य चौकातील प्रसिद्ध मिठाई दुकानासमोर बुधवारी एक ॲम्बुलन्स थांबली. त्यातून पाच ते सहा जणांचे पथक उतरले आणि या मिठाई दुकानात शिरले. काउंटरवरील कॅशियर पासून सेल्समनपर्यंत सर्वांना काहीतरी मिठाई खरेदी करण्यासाठी ग्राहक आले असावेत असे वाटले. पण या पथकाने संपूर्ण दुकानासह दुकानामागे असलेल्या खाद्यपदार्थ तयार करण्याच्या भट्टीपर्यंतचा ताबा घेऊन तपासणी सुरू केली आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकल्याचे त्यांच्या लक्षात आलं. या पथकाने तब्बल दोन-अडीच तास तपासणी केली.
यामध्ये खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या भट्टी पासून विक्री करणाऱ्या कौन्टर पर्यंतच्या अनेक खाद्यपदार्थाच्या उत्पादनाच्या पाकिटावरील तारखा, तसेच काही नमुने यांची जागेवर तपासणी करताना अनेक पदार्थ तपासणीसाठी घेऊन गेले. यामध्ये काही खाद्यपदार्थ आक्षेपार्ह असल्याचेही समजते. त्यामुळे वस्तूंचे नमुने या विभागातील पथक घेऊन गेले असून याबाबत शिरोली परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. तरीही या पथकाने नेलेल्या संशयास्पद पदार्थाबरोबरच काही चांगल्या पदार्थांची नेलेली पॅकेट्स, आणि शेवटी दुकान मालकाशी केलेले हस्तांदोलन हे या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
त्यामुळे धाड टाकली, तपासणी केली तरीही कारवाई होणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
