कोल्हापुरातील निरंजन मगदूम राज्य नाट्य स्पर्धेतील ‘सर्वोत्कृष्ट रंगभूषकार’ पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत गडहिंग्लज कला अकादमीने सादर केलेल्या ‘प्रायश्चित’ या नाटकासाठी ‘सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार’ चे प्रथम पारितोषिक कोल्हापुरातील निरंजन मगदूम यांना प्राप्त झाले. पुणे येथे नुकताच शानदार पारितोषिक प्रदान सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने सन 2023-2024 सालाकरिता घेण्यात आलेल्या २० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत गडहिंग्लज कला अकादमीने ‘प्रायश्चित’ हे नाटक सादर केले होते. या नाटकासाठी कोल्हापुरातील रंगभूषाकार म्हणून निरंजन मगदूम यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून ‘प्रायश्चित’ नाटकाचे निरंजन मगदूम यांची निवड झाली. हा पारितोषिक प्रदान सोहळा नुकताच पुणे येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संपन्न झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक बिभिषण चवरे, प्रधान सचिव विकास खर्गे, अभिनेता, दिग्दर्शक जगन्नाथ निवंगुणे यांच्यासह परीक्षक मंडळ आणि नाट्य रसिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
