पंचगंगेला महापूर; कोल्हापुरकरानी काय करावे! काय करू नये!
कोल्हापूर : गेल्या आठवड्याभराच्या संततधार अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यातला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. २०१९ आणि २०२१ च्या महापुराचे कटू अनुभव लक्षात घेता कोल्हापूरकरांनी सतर्क राहून दुर्घटना, गैरसोय, नागरिकांचे हाल, नुकसान यापासून वाचण्यासाठी सावधानता बाळगावी. प्रशासकीय यंत्रणेच्या सूचना पाळाव्या. स्थलांतराला प्रतिसाद द्यावा. पाणी आलेल्या रस्त्यावर वाहने आणू नयेत. अफवा पसरवू नयेत. अफवांवर विश्वास ठेवू नये. माहितीसाठी अधिकृत यंत्रणेशीच संपर्क साधावा.
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीतील पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी जवळ जवळ गाठली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर महापुराचा धोका होणार आहे. तरीही २०१९ आणि २०२१ साली जे महापूर आले आणि त्यावेळी अनपेक्षित पणे जी वित्त आणि जीवित हानी झाली.ती यापुढे मात्र जास्तीत जास्त टाळता येऊ शकते. त्यासाठी शासन, स्थानिक प्रशासन, पोलीस आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेतच. पण तितकीच जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांचीही आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, काळम्मावाडीसह सर्व धरणे अद्याप पूर्ण भरलेले नाहीत. पण कोणत्याही क्षणी भरून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होईल अशी स्थिती आहे. तरीही आता कोल्हापूर -गगनबावडा रोडवर कळे येथे, कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर चिखली येथे, कोल्हापूर-शिये फाटा रोडवर बावडा येथे मुख्य रस्त्यावर पाणी आले आहे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर-शिरोली जवळ तावडे हॉटेल ते शिरोली फाटा सेवा रस्त्यावर आलेल्या पाण्याने सध्या तरी सांगलीकडून कोल्हापूर कडे जाणारी वाहने सांगली फाट्यावरून महाडिक बंगल्यापर्यंत वळवून महामार्गावर आणावी लागत आहे. पण अद्याप महामार्गावर कोठेही पाणी नाही.
पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील धोका पातळी 43 फूट इतकी असते. इथून पुढे सुरू होतो महापुराचा खरा धोका. अनेक मार्ग बंद होतात. कोल्हापूर शहर आणि नदीकाठच्या गावातील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरते. सध्या शासकीय यंत्रणा सतर्क आहे. पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. प्रशासनाकडून योग्य त्या सूचना जात आहेत. अर्थातच याला मागील महापुराची परिस्थिती, आढावा, आकडेवारी याचाही आधार आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबद्दल दोन्ही राज्य आणि जिल्ह्याचा चांगलाच समन्वय सध्या दिसून येत आहे. त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. ही समाधानाची बाब आहे.
राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले तर पाण्याची पातळी झपाट्याने वाढते त्यामुळे आता सावधानता सतर्कता बाळगावी लागेल. काही रस्ते बंद झाले आहेत. यापुढे गावांचे संपर्क तुटू शकतात. अत्यावश्यक सेवा, वस्तू वगळता इतर गोष्टी टाळल्या पाहिजेत. कामासाठी अपरिहार्य असेल, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडणे ठीक आहे. पण विनाकारण पूर पाहण्यासाठी बाहेर पडू नये, २०१९ आणि २०२१ च्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन स्थलांतरासाठी सेवा, सुविधा घेऊन त्वरित कार्यवाही झाली पाहिजे. बाधित नागरिकांनी त्याला प्रतिसाद द्यावा. जेणेकरून नंतर कोणतीच तारांबळ उडणार नाही.
२०१९ च्या महापुरात जीवित आणि वित्तहानीचे नुकसान प्रचंड प्रमाण होते. लोकांचे प्रचंड हाल झाले होते. रस्त्यावर अडकून पडलेल्यांचे प्रमाण मोठे होते. वाहतूक ठप्प झाली होती. घरेदारे, रस्ते शेती, पीकं यांचे मोठे नुकसान झाले होते. बाहेरून मदत उशिरा आली होती. स्थानिकांची मदत अपुरी पडत होती. हा अनुभव लक्षात घेऊन बाळगलेल्या सतर्कतेमुळे २०२१ च्या महापुरात अनुचित घटना काही प्रमाणात टाळता आल्या. तरी त्यावेळी पाणी पातळी ५६ फुटावर गेली होती. म्हणजे ४३ फुटाच्या धोका पातळीपेक्षा तब्बल १३ फूट वाढली होती. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. त्याचे दुष्परिणामही भोगावे लागले. त्यानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी वेळ लागला. ते अनुभव, ते प्रसंग, ती आकडेवारी लक्षात घेऊन आता सावध झाले पाहिजे. अजून तरी परिस्थिती गंभीर नाही. त्यामुळे अवास्तव अफवा, संभ्रम निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. प्रशासन, सेवाभावी संस्था, व्यक्ती, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यामार्फत येणारी माहिती, मदत, सूचना याचा योग्य वापर, पालन करून त्रास आणि होणारी हानी टाळण्याची दक्षता सर्वांनीच घेतली पाहिजे.
