November 2, 2025

शिरोलीत चोरांना पकडण्यासाठी नागरिकांनीच बजावली पोलिसांची भूमिका

0
Screenshot_20240708-224402_WhatsApp

शिरोली : शिरोली माळवाडी भागातील सावंत कॉलनीत दोन दिवसापूर्वी मध्यरात्री चार चोरटे चोरी करण्यासाठी फिरत असताना एका व्यक्तीस शंका आली. त्यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत फोनवरून कळवले; पण ड्युटीवर असलेल्या ठाणे अंमलदार यांनी दखलच घेतली नाही. चोर स्क्रॅप चोरी करून गेले. दुसऱ्या दिवशी येथील काही सतर्क नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरात चौकशी करून चोर आणि स्क्रॅप चोरीचा माल घेणाऱ्यांचा शोध घेतला. त्यांच्याकडून चोरी आणि चोरीचा माल घेतल्याची कबुलीही करून घेतली.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की शनिवारी रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास शिरोली येथील सावंत कॉलनी मधील शिवसंदेश तरुणा मंडळानजीक ओढ्याजवळ काही चोरटे रस्त्यावरून फिरत असल्याची संशय तेथील एका नागरिकाला आली. त्याने त्वरित शिरोली पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून फोन करून या ठिकाणी चोरटे चोरी करत आहेत तुम्ही त्वरित या अशी सूचना दिली. पण तेथील तेथील ठाणे अंमलदाराने फोन घेऊन कुठे घटना चालू आहे?  चोरटे कुठे आहेत याची माहिती विचारली. सदर व्यक्तीने व्यवस्थित पत्ता सांगितला. पण पोलिसांनी पुढे काही ऐकून न घेता फोन बंद केला. त्यानंतर सदर व्यक्तीने तेथील नागरिकांना जागे केले. जागे झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर येऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक टेम्पो त्या चोरट्यांच्या दिशेने आलेला दिसला. त्या टेम्पोच्या  चालकाने सदर चोरट्याशी बातचीत केल्याचे दिसले. पण त्या टेम्पो चालकास लोक पहात असल्याचे समजले आणि तेथून पळ काढला. नागरिकांनी त्या टेम्पोच्या  पाठलाग केला पण तो सापडला नाही. चोरही पळून गेले. त्यांना शोधण्यासाठी आसपासचा परिसर पिंजून काढला पण चोरटे मिळून आले नाहीत.
दुसरे दिवशी सकाळी त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तेथील सतर्क नागरिकांनी शोधले. त्यामुळे दोन-तीन सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते तीन चोरटे येथील शिवशांती  अपार्टमेंटमधील गेट उघडून तीन चोरटे आत शिरल्याचे दिसून आले.  तेथील एक मोठा चौरस अँगल काढून घेऊन रस्त्यावरून चालत गेलेलेही दिसले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज वरून सदर चोरट्यांचा शोध घेतला असता हे चोरलेले अँगल याच परिसरातील स्क्रॅप व्यावसायिक रुस्तम खान याने विकत घेतल्याची माहिती मिळाली. त्या रुस्तम खान याला फैलावर घेतले असता त्यांनी सदरची अँगल विकत घेतल्याचे कबूल केले. व त्या चोरट्यानाही तेथे हजर केले. लोकांनी या सर्वाना पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे ठरवले. पण सदरचे चोरटे तेथून फरार झाले. त्यानंतर रुस्तम खान यांनी ते चोरलेले अँगल स्वतःच्या रिक्षातून शिवशाही अपार्टमेंटमधील मांगलेकर यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर रुस्तम खानच्या स्क्रॅपची या लोकांनी झडती घेतली असता त्या ठिकाणी बऱ्याचशा  केबल काढून जाळून त्याचे स्क्रॅप गोळा केल्याचे दिसून आले. तसेच या ठिकाणी अल्युमिनियमच्या मोठमोठ्या केबल आढळून आल्या. यापूर्वी शिरोली येथील नदीवरील पाण्याच्या मोटरीच्या भरपूर केबल सदरच्या टोळीने चोरून या स्क्रॅप व्यावसायिकाला विकल्याचा  संशय तेथील नागरिकांनी व्यक्त केला. रुस्तम खान याने त्यांना स्क्रॅप विकल्याच्या चोरट्यांची नावे योगेश गजानन भोसले, सुभाष जाधव व साळुंखे अशी असल्याची माहिती दिली आहे.
रात्रीच्या वेळी चोरीची घटना होत असताना शिरोली पोलीस ठाण्यात याबाबतची त्वरित माहिती देऊन सुद्धा जर पोलीस या घटनेची दखल घेत नसतील तर हे पोलीस नागरिकांच्या जीवित आणि  मालमत्तेचे संरक्षण कसे करणार? अशी चर्चा नागरिकांतून होत आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page