November 2, 2025

शिरोली औद्योगिक क्षेत्रात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड, संवर्धन करणार : सुरेंद्र जैन

0
IMG-20240707-WA0262

कोल्हापूर : आपला परिसर प्रदूषण मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर देशी वृक्ष लागवड करून ती जगविणे हि काळाची गरज आहे.  देशी झाडे लावून हा परिसर निसर्गरम्य बनविण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जेष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले. शिरोली औद्योगिक क्षेत्रात स्मॅकच्यावतीने यावर्षी ५००झाडे लावून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन केले जाईल दरवर्षी ही मोहीम राबवली जाईल अशी ग्वाही चेअरमन सुरेंद्र जैन यांनी दिली.
स्मॅक भवन व शिरोली औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांच्या कडेने विविध ठिकाणी स्मॅक, एमआयडीसी व आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर या संस्थेमार्फत शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याची मोहीम हाती घेणे बाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, उप अभियंता [ स्थापत्य ] अजयकुमार जी. रानगे, शिरोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक पंकज गिरी, सार्वजनिक बांधकाम विभाग चे उद्यान परिवेक्षक किसन गिरी, शिवाजी विद्यापीठाचे गार्डन सुप्रीटेंडंट अभिजीत जाधव, आझाद हिंद चॅरिटेबल ट्रस्टचे राहुल मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीचे आयोजक सुरेन्द्र जैन म्हणाले या मोहिमे अंतर्गत शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये नैसर्गिकरित्या सुशोभीकरण करण्यात येणार आहे. लावलेल्या झाडांची निगा व देखभाल कारखानदारांनी करण्याची संकल्पना या मोहिमे पाठीमागे आहे. या मोहिमेसाठी रोड मॅप तयार करण्यात येऊन, जनजागरणासाठी आकर्षक टॅग लाईन देण्यात येणार आहे.
डॉ. बाचुळकर म्हणाले की शिरोली एमआयडीसी परिसरात जिथे झाडे लावण्यास वाव असेल तेथे देशी झाडे लावली गेली पाहिजेत. त्याचबरोबर त्याची नोंद ठेवणे भविष्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. माणसाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यासाठी वृक्ष लागवड गरजेची असून अनावश्यक वृक्ष तोडीस विरोध केला पाहिजे. जगात दुर्मिळ असणारी पश्चिम घाटाची जैव विविधता टिकवणे आपली जबाबदारी आहे. विकास करताना निसर्गाचा विचार करून समतोल राखणे गरजेचे आहे. जैवविविधते मध्ये जगातील पहिल्या दहा देशांमध्ये आपला क्रमांक आहे आणि तो टिकवणे गरजेचे आहे. भारतामध्ये दरवर्षी आपण दहा लाख हेक्टर जंगल नष्ट करतो. आपण जी झाडे लावायची म्हणतो त्याच्या कित्येक पटीने जंगलतोड सुरू आहे. विकास करताना आपण निसर्ग, पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. कोल्हापूरचा पारा ४१ अंशा वर गेला, तर भारताचा ५६ अंशा वर हे सर्व जागतिक तापमानवाढीमुळे झाले आहे. भारतामध्ये दर व्यक्ती मागे फक्त २८ झाडे आहेत तर अमेरिकेमध्ये प्रत्येक व्यक्ती पाठीमागे ७०० झाडे आहेत. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी वर झाडे लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शिरोली एमआयडीसी मध्ये राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत कोणती झाडे लावावीत, ती किती उंचीची असली पाहिजेत, त्यासाठी किती आकाराचा खड्डा काढला पाहिजे, त्याचे संरक्षण कसे केले पाहिजे, त्यासाठी लागणारी खते व त्याचे प्रमाण, पाणी, या झाडांवर पडणारी कीड इत्यादी बदल सविस्तर माहिती दिली.  झाडे लावण्याच्या मोहिमेसाठी आपले मार्गदर्शन व सहकार्य करू असे त्यांनी सांगितले.
राहुल मगदूम यांनी नवीन लावलेल्या झाडांना क्यूआर कोड देण्यात येणार असून झाड लावणाऱ्या चे नाव, जन्म तारीख, लावलेली तारीख, त्या झाडाचे महत्व आधी माहिती त्यामध्ये असेल. त्याचा पाठपुरावा करून पुढील पाच ते सात व वर्षे काळजी घेतली जाणार असल्याचे सांगितले. उद्यान परिवेक्षक किसन गिरी यांनी परदेशी झाडांच्या आक्रमणा बाबत व त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामा बाबत माहिती दिली.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक म्हणाले की आपल्या सर्वांना कोल्हापूरचा ४१ अंश खाली आणायचा आहे. ते पुढे म्हणाले की स्मॅक च्या सर्व कामामध्ये आपण पुढाकार घेत असतो आणि सुरुवात ही स्मॅक पासूनच करतो.
उप अभियंता अजयकुमार रानगे म्हणाले की झाडे लावल्यानंतर संबंधित कारखानदारांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी झाडांची काळजी घेणे गरजेचे आहे. लावलेले झाड हे जगलीच पाहिजेत या हेतूने प्रत्येकाने एकनिष्ठेने हे कार्य केले तर हे फार मोठे कार्य होणार आहे.
बैठकीस स्मॅकचे ऑ. सेक्रेटरी भरत जाधव, खजानिस बदाम पाटील, संचालक राजू पाटील, शेखर कुसाळे, निमंत्रित सदस्य दीपक घोंगडी, विनय लाटकर, किरण चव्हाण, समिती सदस्य एम. वाय. पाटील, जयदत्त जोशीलकर उद्योजक निशिकांत खाडे, कुमार साळुंखे, सहदेव वरुटे, सुधाकर कुंभार, हरिभाऊ, सचिन पाटील आदी उपस्थित होते. भरत जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page