November 2, 2025

तीन खासदार असून कोल्हापूरचा विकास होत नसेल तर काहीतरी चुकतंय! : खा. शाहू महाराज

0
20240616_191025

कोल्हापूर : एका जिल्ह्यात तीन खासदार मिळणे ही दुर्मिळ बाब आहे. पण कोल्हापूर जिल्ह्याला तीन खासदार मिळाले आहेत. तरीही तीन-तीन खासदार असूनही कोल्हापूरचा विकास होत नसेल तर आपलेच काहीतरी चुकतंय असे स्पष्ट मत नूतन खासदार शाहू महाराजांनी व्यक्त करून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्यक्रम ठरवून तिघांनी एकत्र काम करूया असे आवाहन केले. ते शिरोलीतील स्मॅक भवन येथे सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
स्मॅकचे चेअरमन सुरेंद्र जैन आणि सर्व संचालक यांच्या संयोजनाखाली शिरोलीतील स्मॅक भवन मध्ये जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने कोल्हापूरचे नूतन खासदार शाहू महाराज, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील उद्योजकांचा मेळावाही घेण्यात आला. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मांडल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देताना खा. शाहू महाराज यांनी कोल्हापूरचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याची खंत व्यक्त केली. यासाठी आता प्राधान्यक्रम ठरवून तिघांनी एकत्र काम करू या,  यामध्ये गड संवर्धन, पर्यटन, आयटी हब, पंचांगा नदी प्रदूषण याबरोबरच रस्ते, रेल्वे, आणि विमानसेवेची कनेक्टिव्हिटी याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असे सांगितले.
खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात कोल्हापुरातील अनेक प्रश्न मार्गी लागले असल्याचे सांगून विमानतळ सुशोभीकरण, विस्तारितकरण, महामार्ग, कोकण रेल्वे मार्ग ही कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. विमानाची कनेक्टिव्हिटी आणि वंदेभारत रेल्वे सेवा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
खासदार धैर्यशील माने यांनी औद्योगिक वाढीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात जागेचा मोठा प्रश्न असला तरी जागा मिळेल त्या ठिकाणी उद्योग उभारावे असे सांगताना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील चार मंजूर औद्योगिक वसाहती, डॉकयार्ड, जवळून जाणारा औद्योगिक कॅरिडॉर याचाही फायदा घ्यावा असे आवाहन केले.
उद्योजक मेळाव्यासाठी दिनेश बुधले, संचालक, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन [ केईआय ],  स्वरूप कदम, उपाध्यक्ष , गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन [ गोशीमा ], हरिश्चंद्र धोत्रे, अध्यक्ष, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले [ मॅक ],  संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज [ केसीसीआय ],  राहुल पाटील, उपाध्यक्ष, आयआयएफ [ कोल्हापूर चॅप्टर ], अजय सप्रे, अध्यक्ष, सीआयआय [ दक्षिण विभाग ],  दीपक चोरगे, चेअरमन, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनियरिंग क्लस्टर,  प्रताप पाटील, अध्यक्ष, आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर. आदींसह उद्योजक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page