शिरोलीत प्रेम प्रकरणातून मुलीच्या बापाकडून तरुणाचा खून
शिरोली : पाडळी तालुका हातकणंगले येथील १९ वर्षे वयाच्या तरुणाचा शिरोली पुलाची येथील बुधले मंगल कार्यालयाच्या आवारात निर्घृण खून झाला. संकेत संदीप खामकर असे खून झालेल्या मुलाचे नाव असून त्याचे पेठ वडगाव येथील एका मुलीशी प्रेम प्रकरण होते. यातूनच मुलीचा बाप योगेश सूर्यवंशी याने टोकदार शस्त्राने भोसकून संदीप याचा खून केला. हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. अवघ्या १२ तासात शिरोली एमआयडीसी पोलिसांनी योगेश सूर्यवंशी याला कर्नाटकातील बेळगाव पासून ५० किलोमीटर अंतरावर ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की योगेश सूर्यवंशी याच्या मुलीचे पाडळी येथील संकेत खामकर या मुलाशी प्रेम संबंध होते. याबाबत योगेश सूर्यवंशी यांनी संकेत यास वारंवार हे थांबवण्याबाबत बजावले होते. शुक्रवारी शिरोली येथील बुधले मंगल कार्यालयात सूर्यवंशी कुटुंब शिरोलीतील नातेवाईकांच्या बारशासाठी बुधले मंगल कार्यालयात आले होते. या ठिकाणी आपल्या प्रेयसीला भेटायला संकेत खामकर आपल्या मित्रांसह कार्यक्रमाचे ठिकाणी आला. त्याला पाहताच योगेश सूर्यवंशी याचा संतापाचा पारा चढला. त्यांने संकेत याला मी तुला आर्मीत भरती करण्यासाठी मदत करत असताना तू माझ्या मुलीवर डोळा ठेवून माझ्याशी गद्दारी केलीस असे म्हणत त्याला थेट आपल्या खिशातील धारदार शस्त्र काढून त्याला भोकसले.
यावेळी संकेत याच्या मदतीला आलेल्या त्याच्या मित्रांनाही योगेश याने धमकावून पुढे येण्यास मज्जाव केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संकेतचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर खुनी योगेश सूर्यवंशी तेथून पसार झाला आणि कर्नाटकच्या दिशेने पळून गेला.
शिरोली एमआयडीसी पोलीसांना खुनाची माहिती मिळताच स. पो. नि. पंकज गिरी पोलीस पथकासह घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर खुनी योगेश सूर्यवंशी याचा शोध सुरू केला. वडगाव येथील त्याच्या घरात आणि नातेवाईकांच्याकडे चौकशी केली असता योगेश सूर्यवंशी हा कर्नाटकात पळून गेल्याचे समजले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, करवीर पोलीस उपाधीक्षक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके सूर्यवंशी यांच्या शोधासाठी कर्नाटक राज्यात गेले. बेळगावपासून 50 किलोमीटर अंतरावर पुणे बेंगलोर महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावर सूर्यवंशी मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर संकेतच्या खुनाच्या आरोपाखाली अटकेची कारवाई करण्यात आली.
मयत संकेत हा अनाथ असून त्याचे पालनपोषण त्याच्या आजी आजोबानी केले. तो सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करीत होता. तर खुनी योगेश सूर्यवंशी दुसऱ्या एका गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगत आहे. सध्या पॅरोलवर असलेल्या योगेशने आता खुनाचा गुन्हा केला.
