शाहू महाराजांनी दिवंगत आ. पी. एन. पाटील यांना वाहिली खरी श्रद्धांजली
कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराज निवडून आल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना ‘गड आला पण सिंह गेला’ अशा कृतज्ञतापूर्वक भावना दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या बद्दल व्यक्त केल्या. आमदार पी एन पाटील यांना ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरली.
नूतन खासदार शाहू महाराज यांच्या विजयात दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे योगदान काय आहे हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. त्यामुळे निकालापूर्वीच त्यांचे झालेले निधन खऱ्या अर्थाने चटका लावणारे आहे. कोल्हापुरातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? हा प्रश्न समोर आला तेव्हा राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या प्रगल्भ विचारातून एकच उत्तर आले; ते म्हणजे ‘श्रीमंत शाहू छत्रपती’. पण शाहू महाराज मात्र याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होते. उमेदवारीचा प्रस्ताव आल्यानंतरही त्यांनी नकारच दिला. अशावेळी शाहू महाराजांच्या जवळ असणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आ. सतेज पाटील, आणि आ. पी. एन. पाटील यांच्यावर शाहू महाराजांना तयार करण्याची जबाबदारी आली. यामध्ये आ. पी. एन. पाटील यांचा सततचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला.
महाविकास आघाडीतील कोणता पक्ष या प्रश्नालाही उत्तर ठरले होते ते म्हणजे ‘शाहू महाराज घेतील तो पक्ष’. श्रीमंत शाहू महाराजांचा आणि छत्रपती घराण्याची जनतेशी असलेली घट्ट नाळ लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या जिल्हा व राज्य पातळीवरील नेत्यांना शाहू महाराजांना उमेदवार म्हणून तयार करण्यात यश मिळाले. त्यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेणार म्हणून सांगितले आणि आ. सतेज पाटल आणि आ. पी. एन. पाटील यांची जबाबदारी आणखी वाढली. आ. सतेज पाटील यांनी स्वतः प्रतिउमेदवार समजूनच स्वतःची यंत्रणा कार्यरत ठेवली. स्वतःही ‘रात्रीचा दिवस, हाडाचे काडेआणि रक्ताचे पाणी’ कसे करायचे असते हे दाखवून दिले.
आमदार पी एन पाटील यांनी आपल्या यंत्रणे बरोबरच कोल्हापूर शहर, करवीर, राधानगरी, पन्हाळा, भोगावती या परिसरात जे रान उठवले त्यामुळे विरोधक अक्षरश: हातबल झाले. विरोधकांनी शाहू महाराजांवर बेताल आरोप करण्याचा लटका प्रयत्न केला. आमदार पी एन पाटील यांनी आपल्या भाषणातून अनेक वेळा याचा समाचार घेत आरोपांचे खंडन केले. कोल्हापूर शहरातील सभेत त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. सांगरूळमध्ये त्यांनी घेतलेली खास सभा या परिसरात वातावरण बदलणारी ठरली. तर शेवटच्या टप्प्यात करवीर मतदारसंघातील यवलुज-पडळ परिसरातील पन्हाळा तालुक्यातील गावासाठी पडळ मध्ये सभा घेतली. विरोधी उमेदवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात तीनदा येऊन गेले होते. इतकेच नाही तर शेवटच्या टप्प्यात तीन दिवस कोल्हापुरात थांबून जोडण्या लावत होते. याचा समाचार पडळच्या सभेत पी. एन. पाटील यांनी घेतला. यावेळी ते म्हणाले होते की ‘दिल्ली-मुंबईहून कितीही मोठे नेते येउदेत; काही फरक पडणार नाही. मुख्यमंत्री वारंवार येत आहेत. आता त्यांनी येथेच थांबावे आणि कोल्हापूरचा निकाल बघूनच मुंबईला जावे’. हवे तर तोपर्यंत मुख्यमंत्री कार्यालय कोल्हापुरात आणावे. हा विरोधक आणि मुख्यमंत्र्यांना हाणलेला टोला प्रसिद्धी माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचला. आणि आमदार पी. एन. पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानातून विरोधक हातबल झाले. आणि शाहू महाराज यांच्या विजयाबद्दलचा ठाम विश्वास व्यक्त झाला. शाहू महाराज विजयी झाले. दिवंगत आमदार पी एन. पाटील यांचेच शब्द खरे ठरले.
