कोल्हापुरात महाविकास आघाडीचे बेरजेचे राजकारण, महायुतीचे डॅमेज कंट्रोल
कोल्हापूर : (विजय पोवार) लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र केंद्रातील भाजप आणि राज्यातील महायुतीचा कारभार आणि फोडाफोडीचे, दबावाचे राजकारण याबाबत प्रचंड रोष असल्याने महायुतीला सर्वकाही दुरुस्त करून पुढे जाणे हेच खरे आव्हान बनले. तर महाविकास आघाडीला पोषक वातावरणाचा फायदा घेऊन समाजातील विविध घटकांना बरोबर घेऊन बेरजेचे राजकारण करणे सुकर गेले. यामध्ये महायुतीला केवळ डॅमेज कंट्रोल साठी पंतप्रधान ते मुख्यमंत्री आणि सत्ता ते सामान्य कार्यकर्ता याचा पुरेपूर वापर करावा लागला. तर महाविकास आघाडीत उमेदवाराची निवड उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावरील विश्वास, सहानुभूती आणि आमदार सतेज पाटील यांचे मायक्रो प्लॅनिंग उपयोगी पडले.
महायुती
कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कोण ही उत्सुकता बरीच ताणली गेली. विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यावरील गद्दारी आणि निष्क्रियतेचा शिक्का सर्वेक्षणातून नकारात्मक निकाल देत होता. तरीही शिवसेना शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दोन्ही मतदार संघ हक्काने मिळवले. जिल्ह्यात भाजपकडून एक तरी मतदारसंघात कमळ मिळावे अशी इच्छा होती. भाजपची ताकद असताना दुसऱ्यासाठी लढणे त्यांना पचायला थोडे जड गेले. अर्थातच कोल्हापुरात संजय मंडलिक यांचेवर भाजप कार्यालयात उघड राग व्यक्त झाला. भाजपमध्ये सर्वात जास्त ताकद असलेल्या महाडिक गटाच्या शोमिका महाडिक यांच्याकडे भाजपच्या हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार म्हणून पाहिले जात होते. महाडिकही पक्षाचा आदेश आला तर लढू असे म्हणत होते. पण ना आदेश आला ना उमेदवारी! ‘उरलो मी आता उपकारापुरता’ अशी महाडिक गटाची अवस्था झाली. युती धर्म पाळणे हीच त्यांची अपरिहार्यता ठरली. शिंदे गटाच्या उमेदवारांच्या वरील नाराजी बाजूला करण्यासाठी ‘मान गादीला मत मोदीला’, ‘नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत द्या’ असे मुद्दे पुढे आणावे लागले.
कागल तालुक्याची संपूर्ण धुरा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या शिरावर घेतली. पण तेथील भाजपचे नेते असलेले समरजित घाटगे काहीसे बाजूलाच पडले. याबरोबरच त्यांचे पुढील आमदारकीचे स्वप्नही भंग होण्याची चिन्हे निर्माण झाली. स्थानिक नेते संग्राम कुपेकर यांनी व्यक्त केलेली उघड नाराजी ते सर्वसामान्य जनतेतून उमटणारी नाराजी यातूनही प्रचाराची रणनीती आखून पुढे जाणे हेच महायुतीच्या नेत्यांना आव्हान बनले.
हातकणंगले मतदारसंघातही शिंदे गटाचे खासदार म्हणून धैर्यशील माने यांच्यावरील सामान्य मतदारांचा गद्दारी, निष्क्रियता आणि संपर्काचा अभाव यामुळे रोजच रोष होताच. पण महायुतीतील प्रकाश आवाडे, संजय पाटील, यांनी थेट बंडापर्यंतची तयारी, आ.राजेंद्र पाटील यड्रावकर, आ.विनय कोरे, महादेवराव महाडिक यांची सुरुवातीला असलेली अप्रत्यक्ष नाराजी हे सर्व काही दुरुस्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापुरात येऊन मुक्काम करावा लागला. आणि शेवटच्या टप्प्यात रस्त्यावर येऊन भर उन्हात रॅली काढावी लागली. भाजपचा उमेदवार नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घ्यावी लागली. त्यासाठी सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना कामाला लावून त्यांची परीक्षा घेण्यात आली. भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांनाही सांगलीच्या सभेतून सवड काढून कोल्हापुरात यावे लागले. अंबाबाई दर्शन हे निमित्त झाले आणि नेत्यांना कान पिचक्या देणे भाग पडले.
इतके सगळे कमी पडले म्हणून की काय भाजप आणि संजय मंडलिक यांनी विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर आणि घराण्यावर ही आघात केले. धुळ्यावरून राजवर्धन कदमबांडे यांना कोल्हापुरात आणून गादीचा आणि रक्ताचा वारसा सांगण्याचा प्रयत्न केला. यातून जुना वाद उकरून काढण्याचा प्रयत्न केला. तर राजर्षी शाहू महाराज आणि उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्यात विनाकारण तुलना करण्याचाही प्रयत्न केला. हे कोल्हापूरच्या जनतेला फारसे रुचले नाही.
महाविकास आघाडी
महाविकास आघाडीतून कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवार देताना भाजप आणि शिंदे गट या दोघांनाही लक्ष्य करून रणनीती आखली. हातकणंगलेतून लढाऊ आणि निवडून येण्याची क्षमता असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी देण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निश्चित केले. त्याला राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यासह घटक पक्षाने मान्यता ही दिली. पण राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. महाविकास आघाडीने राजू शेट्टींना समर्थन दिले. पण त्यांनी किमान महाविकास आघाडी बरोबर यावे अशी अपेक्षा केली तर त्यांनी नकार दिला. अखेर महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी त्यांचा नाद सोडला. आपला उमेदवार देऊन लढवून आणण्याचा विचार पुढे केला. तरी शेवटपर्यंत राजू शेट्टीची वाट पाहिली. त्यांनी हट्ट सोडला नाही. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या हाती उमेदवारीची मशाल दिली. ते महाविकास आघाडीचे उमेदवार झाले. सत्यजित पाटील उमेदवारीतून संपूर्ण जिल्ह्यात प्रतिसादाची लाट निर्माण झाली.
कोल्हापूर मतदारसंघात छत्रपती घराण्यात उमेदवारी देण्याचा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात होते. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी पुढे आणलेला हा विचार होता. शाहू महाराजच उमेदवार असावेत असा शरद पवार यांचा आग्रह होता. यासाठी आ. सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील, व्ही. बी. पाटील यांना प्रयत्न करावे असे सांगितले. शाहू महाराज यासाठी अजिबात तयार नव्हते. पण सध्याची देशासह कोल्हापूरची परिस्थिती, सामाजिक स्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. आणि उमेदवारीची किती गरज आहे हे दाखवून दिले. अखेर शाहू महाराज तयार झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरात आले. थेट राजवाड्यावर जाऊन शाहू महाराजांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि स्वागत ही केले. शरद पवार यांनीही कोल्हापुरातील उमेदवारी घेतल्याबद्दल शाहू महाराजांचे आभार मानले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी प्रचारासह सर्व रणनीतीची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. सर्व घटक पक्षांना सामावून घेतले. शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, काँग्रेसचे आ. पी. एन. पाटील आ.जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर, आ. ऋतुराज पाटील, शेका पक्ष, जनता दल, भाकप, माकप, समाजवादी, लाल निशाण आदी सर्व पक्षांना एकाच व्यासपीठावर आणले. आ. सतेज पाटील यांनी समाजातील सर्व स्तरातील जाती-धर्माच्या सामाजिक संस्था, संघटना, विविध क्षेत्रातील संघटना यांचे स्वतंत्र मिळावे घेतले. बैठका घेतल्या. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मतदारसंघातील संपूर्ण गावे प्रत्यक्ष भेट देऊन पिंजून काढली. याशिवाय माजी आ. मालोजी राजे युवराज्ञ्नी संयोगिताराजे, मधुरिमाराजे. शहाजीराजे, यशराजे या छत्रपती घराण्यातील सर्वांनी प्रचार यंत्रणेत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून सहभाग घेतला. त्याला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत गेला. एक भावनिक सहानभूती आणि उत्स्फूर्तता तयार झाली. प्रत्येक क्षेत्रातील समाजातील लोकांचा राजर्षी शाहूंचे कार्य अव्याहतपणे पुढे नेणारे खरे वारस, जनतेचे खरे प्रतिनिधी म्हणून श्रीमंत शाहू महाराजांना प्रतिसाद मिळत गेला. कोल्हापुरातील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सभा हा या उत्स्फूर्त प्रतिसादाचा कळस ठरला.
आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. प्रत्यक्ष मतदानातून सर्व काही प्रतिबिंबित होणार आहे. पण महाविकास आघाडीचे शेवटपर्यंत बेरजेच्या राजकारण आणि महायुतीचे मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून येण्यापर्यंत केलेले डॅमेज कंट्रोल यामध्ये यशस्वी कोण होणार हे ४ जुनच्या निकालातून कळणार आहे.
