December 27, 2025

राजर्षी शाहूंचा मी रक्ताचा, विचारांचा, कायदेशीरही वारस : श्रीमंत शाहू छत्रपती

0
20240420_202142

कोल्हापूर : आ. राजवर्धन कदमबांडे यांनी धुळ्याहून खास कोल्हापूरात येऊन शाहू महाराजांच्या विरोधातील महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनीही आपल्या भूमिकेसह वस्तुस्थिती स्पष्ट करणारे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
“राजर्षी शाहू महाराज यांच्या थेट रक्ताचा आणि विचारांचा मी वारसदार आहे शाहूंचे समतावादी विचार समाजात रूजविण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत, यामुळे जनतेने मला स्वीकारले तर आहेच, शिवाय वारसदार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. हिंदू कायद्यानुसार दत्तक प्रक्रिया झाल्याने मी कायदेशीर वारसदार आहे” असे पत्रक कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील इंडिया व महाविकास आघाडी, काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
शाहू छत्रपती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  राजर्षी शाहू महाराजांच्या रक्ताचा वारस म्हणून छत्रपती शहाजी महाराज यांनी मला दत्तक घेतले. त्यामुळे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा आपण कायदेशीर वारसदार  झालो आहे. या प्रक्रियेला तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू व केंद्रीय गृहमंत्री लाल बहाद्दूर शास्त्री  यांनी १९५६ चा हिंदू कायद्यानुसार याला मान्यता देत शिक्कामोर्तब केले.

मी राजर्षी शाहूंच्या रक्ताचा, कायद्यानुसार तसेच विचारांचा वारसदार आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या कन्या राधाबाईसाहेब उर्फ आक्कासाहेब महाराज यांचे चिरंजीव विक्रमसिंह पवार अर्थात छत्रपती शहाजी महाराज यांच्या कन्या शालिनीराजे यांचा मी पूत्र आहे, म्हणजे मी राजर्षी शाहू महाराज यांचा खापर पणतू असल्याने थेट रक्ताचा वारसदार आहे. दत्तक विधानानंतर छत्रपती घराण्याचा मी वारसदार आहेच, पण त्याच बरोबर मी शाहू विचारांचा वारसदार आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. गेल्या साठ वर्षात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी विचार राज्य आणि देशातही पोहोचविण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत. राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारस असल्याने जनतेने मला स्वीकारले आहे. कोल्हापूरच्या लोकांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केले,  त्यांच्या या प्रेमामुळेच मी जनतेशी एकरूप झालो आहे. साठ वर्षात जनतेकडून मिळणारे अखंड प्रेम, लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना झालेली विराट गर्दी आणि प्रचाराला मिळत असलेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता हे सिद्ध होते. पत्रकात पुढे म्हटले आहे की, ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आयुष्यभर समतेसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी अहोरात्र कार्य केले.  अशा विचारधारेच्या विरोधात राजवर्धन कदमबांडे यांचे काम सुरु आहे, जे स्वत:ला राजर्षी शाहूंच्या विचारांचे वारसदार म्हणवतात, याचे आपल्याला मनस्वी दु:ख होत आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page