December 27, 2025

कायदे मोडून काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे आहेत : नरेंद्र मोदी

0
20240428_000706

कोल्हापूर : देशात  गेल्या १० वर्षात झालेला विकास पाहून काँग्रेसला आपण एनडीए आघाडीची बरोबरी करू शकत नाही याची जाणीव झाली आहे. म्हणून काँग्रेसने धोरण बदलून देशविरोधी अजेंडा आणला आहे. यातून त्यांना आरक्षण धर्माच्या नावावर वाटून आणि कायद्यात बदल करून देशाचे तुकडे करायचे आहेत. म्हणून त्यापासून सावध राहिले पाहिजे. महाराष्ट्र आणि भारताचे भवितव्य घडवण्यासाठी महायुतीचे मंडलिक आणि माने यांना निवडून द्या. असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरात झालेल्या महायुतीच्या विराट जाहीर सभेत केले.
एनडीए म्हणजेच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर मतदार संघाचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ येथील तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले,  कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या सभेला कोल्हापूर सांगली सह पश्चिम महाराष्ट्रातील हजारो लोकांनी हजेरी लावली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपकी बार 400 पार आणि मान गादीला मत मोदीला असे फलक घेऊन सभेत चैतन्य निर्माण केले होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या जनतेला अभिवादन करताना श्री अंबाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, आणि महाराणी ताराबाई यांचेही स्मरण केले. यावेळी पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामुख्याने काँग्रेस पक्ष, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले फुटबॉल कोल्हापूरचा आवडता खेळ आहे त्याच भाषेत बोलायचे म्हणजे दोन टप्प्यात झालेल्या मतदानात एनडीए आघाडीचा स्कोर डबल झाला आहे. आता तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूरच्या मतदारांनी इंडिया आघाडीला चित्रपट करावे. काँग्रेसने आता आपले धोरण बदलले आहे.  काश्मीर मध्ये 370 कलम पुन्हा लागू करण्याची घोषणा केली आहे. पण मोदींनी घेतलेला निर्णय  बदलण्याची त्यांची हिम्मत आहे का?  तुम्ही तो बदलून देणार का?  ज्या पक्षाचे तीन अंकात खासदार निवडून येणार नाही ते पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहेत. त्यांना पाच वर्षात पाच पंतप्रधान द्यायचे आहेत. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात मुख्यमंत्री बदलण्याचा फॉर्म्युला देशात आणू पाहत आहेत. कर्नाटक, तामिळनाडूत सत्ता आल्याने त्यांनी स्वतंत्र दक्षिण भारतची मागणी करून देशाचे तुकडे करण्याची योजना आखली आहे. पण ‘पेशावर ते तंजावर अखंड भारत’  हा भाजपचा नारा आहे. अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्याचे ५०० वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. याच मंदिराला काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी विरोध केला. तरीही सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी मंदिर होते हे मान्य केले. आणि या ठिकाणी मंदिर उभारले गेले. मंदिराच्या विश्वस्तानी त्यांना माफ करून राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी निमंत्रित केले. पण ते निमंत्रण त्यांनी ठोकरले. आता त्यांनाच ठोकरण्याची वेळ आली आहे.
सनातन धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या आणि औरंगजेबला मानणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरे यांना पाहून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटत असेल याचा विचार करा. काँग्रेसने कायद्यात बदल करून आपल्या वारसांच्या हक्काची मालमत्ता ही काढून घेण्याचा डाव आखला आहे. तुमच्या कमाईतून मिळालेला पैसा आणि पैसा काँग्रेसला वसूल करून तुम्ही देणार आहात का? असा प्रश्न आहे. काँग्रेसने कर्नाटकात सत्ता आल्यानंतर ओबीसीतील संपूर्ण आरक्षण मुस्लिमांना मिळावे यासाठी सर्व मुस्लिम समाजाला एका रात्रीत ओबीसी म्हणून जाहीर केले. त्यामुळे इतर ओबीसी समाजावर अन्याय झाला. हाच फॉर्म्युला त्यांना संपूर्ण देशात आणायचा आहे. संविधान बदलून आरक्षण धर्माच्या नावावर ते वाटू पाहत आहेत. भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात शाश्वत विकासाची कामे केली आहेत. यामध्ये आत्मनिर्भर भारत, उद्योग, स्टार्टअप यामुळे भारत मोबाईल बनवणारा प्रथम क्रमांकाचा देश बनला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळी दिशा मिळाली आहे. तरुणांच्यासाठी मुद्रा लोन योजनेतून दहा लाखाचे कर्ज आता 20 लाख रुपये मिळणार आहे. महिलांना सर्वच क्षेत्रात संधी आणि सुरक्षा ही मोदींची गॅरंटी आहे. सरकारी नोकरीची संख्या वाढवली आहे. देशातील दहा कोटी महिला स्वावलंबी बनवल्या असून तीस कोटी महिला लखपती दीदी बनवणार आहेत.  कोल्हापूरच्या विकासासाठी ही आम्ही योजना आणल्या असून यामध्ये समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, वंदे भारत रेल्वे, याबरोबरच कोल्हापूर वैभववाडी रेल्वे जोडण्याची योजना यामुळे श्री अंबाबाई शक्तिपीठाला या सर्व दळणवळणाच्या सुविधांमुळे भक्त आणि पर्यटकांची चांगली सोय होणार आहे. नवीन उद्योग वाढीस चालना मिळणार आहे. तुम्ही संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना दिलेले मत हे सरळ मोदींना देणार आहात. कडाक्याचे ऊन आणि लग्नसराई यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणार नाही याची दक्षता घेऊन जास्तीत जास्त मतदान करावे. आणि एनडीएच्या उमेदवारांना निवडून आणावे. असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. तशीच वेळ आली तर मी माझे दुकान बंद करीन असे म्हंटले होते. पण आता त्यांचे पुत्र काँग्रेसच्या हाताचा प्रचार करीत आहेत. देशासाठी काम करणारा कर्तृत्ववान पंतप्रधान पाहिजे की उन्हाळा आला म्हणून गारव्यासाठी परदेशात पळणारा आणि आईचा पदर पकडून काम करणारा नेता पाहिजे. हे तुम्हीच ठरवा.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्यावेळी कोल्हापुरात टोलचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी भाजप सरकारने कोल्हापूर टोलमुक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी सर्जिकल स्ट्राइक केले त्यामुळे त्यांची कनखर भूमिका स्पष्ट झाली. यावेळी कोल्हापूरचा हुंकार दिल्लीच्या संसदेत पोहोचला पाहिजे. 400 पार मध्ये कोल्हापूरचे दोन्ही खासदार असले पाहिजेत.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या काव्य शैलीत भाषण केले. आणि पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आत्मनिर्भर, विकसित भारत बनवण्याचे मोदी यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे देशातील गरिबी पूर्णपणे हटणार आहे. पूर्ण देश भ्रष्टाचार मुक्त होत असून मोदींनी कोल्हापूरला भरभरून दिले आहे. रस्ते, रेल्वे, एअरपोर्ट, जलजीवन, ई-बसेस यामुळे कोल्हापूर प्रगतीपथावर जाणार आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड विकासाची कामे केली. त्यामुळे देश प्रगतीपथावर गेला आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एनडीए आघाडीत सहभागी झालो आहोत. गेल्या 40-50 वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते भाजपने गेल्या दहा वर्षात केले. मोफत रेशन, पाच वस्तू मोफत, गॅस, चंद्रयान मोहीम अशी अनेक कामे त्यांनी केली असून आयोध्येतील राम मंदिर हा त्यावरील एक कळस आहे. संरक्षण खात्यातील यंत्रसामग्री भारतात बनवण्याचे त्यांचे कार्य संपूर्ण जगाला दिशा देणारे आहे.

यावेळी उमेदवार धैर्यशील माने यांनी ‘गद्दार नही खुद्दार है हम’ असे म्हणत गेल्यावेळी मी महायुतीतूनच लढलो, धनुष्यबाण हेच चिन्ह होते. शिवसेना हाच पक्ष होता असे स्पष्टीकरण देऊन तब्बल साडेआठशे कोटींची विकासकामे मतदारसंघात केल्याचे सांगितले. उमेदवार संजय मंडलिक यांच्यासह माजी आमदार सुरेश हळवणकर, आ. प्रकाश आवाडे,यांनी आ. प्रकाश आबीटकर, आ. राजेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त करताना आपल्या मतदारसंघातून संजय मंडलिक, धैर्यशील माने यांना भरघोस लीड देण्यावर असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार अमल महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, समरजीत घाटगे, के. पी. पाटील, वीरेंद्र मंडलिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संजय पाटील, आमदार विनय कोरे, माजी आमदार चंद्रदीप नरके आदी महायुतीतील नेते, कार्यकर्ते, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page