विधानसभेला सर्व जागा लढवणार, डॉ. आंबेडकर, छत्रपतींच्या गादीचा मान राखा : मनोज जरांगे पाटील
परभणी : लोकसभेला मी किंवा समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही. तसेच एकही अपक्ष उमेदवार उभा केलेला नाही, जरी उमेदवार उभे केलेले नसले तरी विधानसभेला मात्र सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. लोकसभेला कोणाला पाडा हेही सांगितलेले नाही. पण त्याचा कोणी गैर अर्थ काढू नये. असे म्हणताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपतींच्या गादीचा मान राखायला हवा, असे मनोज जरांगे पाटील म्हणत आपली राजकीय वाटचाल स्पष्ट केली.
दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने बीडहून छत्रपती संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आजारी असल्याने जरांगे मतदानासाठी ॲम्ब्युलन्समधून आले होते. त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागडच्या गोरी गांधारी येथे मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी पुढील राजकीय वाटचालीची घोषणा केली. ते म्हणाले आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत, सर्व २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहोत. यावेळी लोकसभेसाठी समाजाला आवाहन करतो की, मराठा आणि कुणबी यांच्या बाजूने असणाऱ्या उमेदवाराला सहकार्य करावे. एखाद्याला पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे, यावेळेस पाडणारे बना. जो उमेदवार सगे-सोयऱ्यांच्या बाजुचा आहे त्याला मतदान करावे. मराठ्यांना बरोबर माहिती आहे की कोणाला मतदान करावे.
प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंसमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु तो मराठा समाजाने नाकारला होता. जरांगे यांनी लोकसभेला उमेदवार न देण्याचाही निर्णय घेतला होता. आता विधानसभेसाठी जरांगे यांची ही घोषणा विद्यमान आमदार आणि राजकीय पक्षांना अडचणीची ठरणार आहे.
