November 4, 2025

रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठमोळा ‘चायवाला’

0
IMG-20240423-WA0261

मुंबई : चायवाला आता रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. ‘चायवाला’ हा मराठी चित्रपट लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा मोशन पोस्टर रिलीज करून करण्यात आली आहे. ‘चायवाला’च्या रूपात एक धम्माल विनोदी मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा सिनेमा सामाजिक संदेशही देण्याचं काम करणार आहे.
हॅाट चॅाकलेट प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे सहनिर्मिते तानाजी वगरे आणि गोविंद वाघमारे आहेत. अजय-उद्भव या जोडगोळीकडे ‘चायवाला’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘करोड़ों चाहने वालों का मेला है, कौन कहता चायवाला अकेला है…’ हे चित्रपटाच्या पोस्टरवरील वाक्य बरंच काही सांगणारं आहे. सोशल मीडियामुळे आज चायवाल्यांपासून वडापाववाल्यांपर्यंत सर्वच जण फेमस झाले आहेत. यात दिल्लीतील डॅाली चायवाल्याची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘चायवाला’ चित्रपटातील नायक नेमका कसा असणार आहे याबाबत उत्सुकता वाढली आहे. ‘सम ड्रीम्स नेव्हर स्लीप’ ही टॅगलाईनही खूप मार्मिक आहे. या चित्रपटाद्वारे प्रथमच एक अनाथ मुलगा आणि मुलगी रुपेरी पडद्यावर नायक-नायिकेच्या रूपात दिसणार आहेत. डोक्यावर पांढरी टोपी, बनियान आणि पाठीमागे चुलबुल पांडे स्टाईलमध्ये अडकवलेला गॅागल असा चायवालाचा पाठमोरा लुक पोस्टरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. हा चायवाला नेमकी काय धम्माल करतो हे चित्रपटात पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
‘चायवाला’मध्ये अजय सूर्यवंशी, राजयोगिनी, पार्थ भालेराव, कमलेश सावंत आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची पटकथा तसेच संवादलेखन विनय येरापले यांनी केलं आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. गीतकार विनय येरापले यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार मिलिंद मोरे यांनी संगीत दिलं आहे. विजय पाटील रंगभूषा करणार असून, संतोष यादव कार्यकारी निर्माते आहेत. संजय केदारे निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम पाहात असून, व्हिएफएक्सचं काम बाळासाहेब बोठे करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page