December 27, 2025

चांगभलंचा गजर, गुलाल-खोबरं, भाविकांच्या गर्दीने फुलला जोतिबा डोंगर

0
20240423_181700

कोल्हापूर : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ चा गजर करीत संपूर्ण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, आणि आंध्र प्रदेशातील तमाम लोकांचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबाच्या चैत्र पौर्णिमेची यात्रा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात संपन्न झाली.
कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी म्हणजेच ज्योतिबा डोंगरावर परंपरागत चैत्र पौर्णिमेच्या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील भाविक गेल्या तीन दिवसापासून कोल्हापुरात आणि ज्योतिबा डोंगरावर येण्यास सुरुवात झाली होती. एसटी, बस, ट्रक, टेम्पो, लक्झरी, जीप, कार,  मोटरसायकल, चालत आणि बैलगाड्याही घेऊन देखील भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले होते. गेल्या तीन दिवसापासून गुलाबाची उधळण करीत जोतिबा यात्रा सुरू होती. आज यात्रेचा मुख्य दिवस होता. पहाटे पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधुरी शिंदे यांच्या उपस्थितीत अभिषेक आणि शासकीय पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करीत जोतिबा देवाचे दर्शन घेतले. दुपारी एक वाजता सालाबाद प्रमाणे मानाच्या 108 सासन काठ्यांची मिरवणूक निघाली. दरवर्षी पालकमंत्री आणि जिल्ह्यातील मंत्री यांच्या उपस्थितीत सासनकाठयाच्या मिरवणुकीची सुरुवात होते. यावर्षी आचारसंहिता असल्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडके यांच्यासह पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत सासन काठ्यांच्या मिरवणुकीची सुरुवात झाली. मानांच्या  प्रथम क्रमांकाची निनाम पाडळी जि. सातारा येथील पहिले मानाच्या काठीचे पूजन जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी केले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मानाची  सासनकाठी विहे, ता. पाटण  या सासनकाठीचे पूजन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. यावेळी कोल्हापूरचे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आणि आ.  सतेज पाटील उपस्थित होते. त्यानंतर इतर सर्व मानाच्या सासन काठयाची मिरवणूक यमाई मंदिराकडे गेली.
सायंकाळी जोतिबाची पालखी यमाईच्या भेटीसाठी निघाली. या पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यासाठी भाविकांनी दोन्ही बाजूला प्रचंड गर्दी केली होती. पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करून जोतिबाचे दर्शन घेऊन भावीक परतीच्या मार्गाला लागले. दरवर्षी राज्य आणि परराज्यातून येणाऱ्या भाविकांच्या  सोयीसाठी कोल्हापुरातील  विविध सामाजिक संस्था, कंपन्या, मंडळे यासह वैयक्तिक पातळीवर अनेकांनी विविध सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या होत्या. यामध्ये आरोग्यसेवा, मोटर आणि मोटरसायकल दुरुस्तीची सेवा, चहा, सरबत, पाणी प्रसादआणि महाप्रसादाचे वाटप याचा समावेश होता.
सहज सेवा ट्रस्टच्यावतीने गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेला सलग चार दिवसाचा मोफत अन्नछत्राचा उपक्रम यावरही वर्षी सुरु राहिला. या ठिकाणी लाखो भाविकांनी येथील भोजनाचा लाभ घेतला.
कोल्हापूर जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची प्रगती होऊ दे अशी मागणी श्री दख्खनचा राजा जोतिबाकडे केल्याचे जिल्हाधिकारी अमोल एडके यांनी सांगून सासन काठ्यांची पूजन करून यात्रेला सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्यावतीने यात्रेसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा आणि चौक बंदोबस्त ठेवण्यात आला असून भावीकही योग्य पद्धतीने आणि सर्व नियमांचे पालन करून ज्योतिबाचे दर्शन घेत आहेत असे जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page