मोदींची सभा, नेत्यांची कसोटी, लोकांना उत्सुकता
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा २८ एप्रिल रोजी तपोवन मैदान, कोल्हापूर येथे होणार आहे, ही माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हयातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील काहीमतदार संघाच्या निवडणुका पार पडल्या. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचारसाठी येऊन गेले. आता मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ आहेत यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले मतदार संघाचा समावेश आहे. या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक,धैर्यशील माने लढवत आहेत. राष्ट्रीय पातळीवर एनडीए, आणि राज्यातील महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्या प्रचारार्थ भाजपच्यावतीने २८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात येणार आहे. या सभेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य सरकार मधील इतर मंत्री उपस्थित राहणार आहे. त्यामुळे दि.२८ रोजी कोल्हापुरात होणाऱ्या या सभेसाठी महायुतीच्या घटक पक्षाचे नेते सभा भव्य प्रमाणात व्हावी यासाठी कामाला लागले आहेत. या सभेची भव्यता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात जनतेसाठी घोषणा, आश्वासन, आणि संदेश यातून येथील उमेदवारांचे विजयाचे गणित ठरणार आहे. त्यामुळे मोदींच्या सभेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
