रिपाईच्या रूपा वायदंडेची माघार, शाहू छत्रपतींना पाठींबा
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रुपा वायदंडे यांनी माघार घेतली. त्यांनी, महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला.त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली.
मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
वायदंडे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी रुपा वायदंडे म्हणाल्या, “देशातील सध्य स्थितीत संविधान वाचण्यासाठी साऱ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. शाहू छत्रपती यांचे कार्य सगळ्या समाजासाठी मोठे कार्य आहे. म्हणून या निवडणुकीत शाहू छत्रपती यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वेगळे ऋणानुबंध होते. ते जपण्यासाठी मी निवडणुकीतून माघार घेत आहे. आणि शाहू छत्रपतींना पाठिंबा देत आहे.”
मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, “छत्रपती घराण्याच्यामार्फत रुपा वायदंडे यांचे आभार मानते. संविधान वाचविण्याच्या या लढाईत त्या सहभागी झाल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाया हा शाहू -फुले- आंबेडकर यांच्या विचारधारेवर आहे. या पक्षाच्या रूपा वायदंडे यांनी शाहू छत्रपतींना जो पाठिंबा दिला त्याबद्दल आनंदी आहे. नवीन ऊर्जा आणि प्रेम लाभले. तुम्ही साऱ्यांनी जी साथ दिली त्याबद्दल मनापासून आभारी आहे. निश्चितच तुमचा सन्मान होईल. या निवडणुकीत तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलात. आम्ही कायम तुमच्या सोबत राहू.”
माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी म्हणाले, ” रूपा वायदंडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा देण्याचा जो निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल.”
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) गटाचे प्रदेश संघटक कैलास जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सरदार आमशीकर, दयानंद दाभाडे, प्रताप बाबर, रणजीत हळदीकर, प्रिया कांबळे, शैलेश सोनुले, वंदना वायदंडे, रंजना कांबळे, सीमा कांबळे आदी उपस्थित होते.
