November 4, 2025

महावितरणच्या नाट्यस्पर्धा कर्मचाऱ्यांसाठी ऊर्जादायी : अंकुश नाळे

0
IMG-20240422-WA0394

कोल्हापूर : देशभरात नावलौकिक प्राप्त ‘कलानगरी’ कोल्हापूरात महावितरणची नाट्यस्पर्धा होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. दरवर्षी होणाऱ्या नाट्यस्पर्धेतून महावितरणातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. वीज कर्मचाऱ्यांकडून दर्जेदार कलेचे सादरीकरण होतेय, हे कौतुकास्पद आहे. दैनंदिन कामात बदल होऊन विरंगुळा मिळाल्याने ही नाट्यस्पर्धा कर्मचाऱ्यांसाठी ऊर्जादायी ठरत आहे, असे प्रतिपादन पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले.

कोल्हापूर परिमंडलाच्या यजमानपदाखाली संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नाळे बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता परेश भागवत तर प्रमुख अतिथी म्हणून पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास पुणे प्रादेशिक विभागातील अधिकारी-कर्मचारी, कलाकार व नाट्यरसिकांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना मुख्य अभियंता .राजेंद्र पवार यांनी महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये चांगले कलावंत आहेत, असे कौतुक करून नाट्यसादरीकरणासाठी संघाना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात मुख्य अभियंता . परेश भागवत यांनी कोल्हापूरच्या कलावैभवाचा गौरव केला. केवळ स्पर्धेसाठी नव्हे तर रसिकांना आनंद देण्यासाठी कलाकारांनी कला सादर करावी, असा मोलाचा सल्ला दिला. कर्मचारी कलाकारांच्या सहभागामुळे व रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे ही नाट्यस्पर्धा यशस्वी होते आहे, असेही भागवत यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे, आभारप्रदर्शन कार्यकारी अभियंता (प्रशासन) अभिजीत सिकनीस तर सुत्रसंचलन सुरेश पाटील यांनी केले.

नाट्यस्पर्धेच्या प्रारंभी कोल्हापूर परिमंडलाने पु.ल. देशपांडे लिखित ‘ती फुलराणी’ हे अजरामर मराठी नाटक सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा’ या मंजुळाच्या स्वगताला नाट्यरसिकांनी उस्फुर्त दाद दिली. दुपारच्या सत्रात पुणे परिमंडलाने प्र.ल. मयेकर लिखित ‘अग्निपंख’ नाटकातील जातीव्यवस्था, आधुनिक मुल्यांचा जुन्या मुल्यांशी संघर्ष, सरंजामशाहीचा अस्त होऊन लोकशाहीचा उदय हा दाहक आशय ताकदीने मांडला.

उद्या सकाळी 11.00 वाजता प्रल्हाद जाधव लिखित ‘विठू माझा लेकुरवाळा’ हे बारामती परिमंडलाचे नाटक सादर होईल. नाट्यरसिकांना विनामूल्य प्रवेश उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page