सुरतमध्ये काँग्रेसला धक्का देत भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध?
सुरत : गुजरात मधील सुरत मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची खासदार म्हणून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरला. याबरोबरच सुरेश पडसाला या उमेदवाराचाही अर्ज अवैध ठरला. बीएसपीचे उमेदवार प्यारेलाला भारती यांच्यासह इतर उमेदवारांनीही माघार घेतल्याने मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. अशी माहिती गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी दिली.
कुंभानी आणि पडसाला या दोघांच्याही अर्जावरील सह्यामध्ये फरक दिसून आल्याने हे अर्ज अवैध ठरवले असल्याचे निवडणूक अधिकारी सौरभ पारधी यांनी सांगितले. तर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार प्यारेलाला भारती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. इतर उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजप उमेदवार मुकेश दलाल यांच्या विरोधात उमेदवारच नसल्याने त्यांची खासदारपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गोहिल यांनी भाजपच्या ईशाऱ्यावर आमच्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवला आहे. यावेळी परिस्थिती भाजपला अनुकूल नसल्याने त्यांना पराभवाची जाणीव झाली होती. म्हणूनच काहीही करून काँग्रेस उमेदवार कुंभानी यांना रिंगणातून बाहेर काढण्याचा डाव केला. आणि हे कृत्य केले आहे. कुंभानी यांना धमकी देण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करून गोहिल यांनी ही लोकशाहीची हत्या असून निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयविरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही स्पष्ट केले.
